India Weather Update : महाराष्ट्रापाठोपाठ आता गुजरातमध्येही पावसानं हाहाकार माजवलाय. गुजरातमधल्या अनेक शहरात पूरस्थिती (Flood) निर्माण झालीये. त्यामुळे जनजिवन विस्कळीत झालंय. जुनागडमध्ये पुराच्या पाण्यात काहीजण अडकले होते. त्यांना एनडीआरफच्या मदतीने बाहेर काढण्यात आलंय. नवसारी शहरातही पाणी शिरलंय.
मुसळधार पावसामुळे गुजरातमधलं जुनागड पाण्याखाली गेले आहे. आज मात्र काहीशी पावसाने उसंत घेतल्याने पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. जिथे काल पुराच्या पाण्याचा लोंढा दिसत होता आज तिथे चिखलाचा गाळ दिसत आहे. काही ठिकाणी मात्र पूरस्थिती कायम आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलं जात आहे.
पुन्हा एकदा दिल्लीवर पुराचं संकट
जे चित्र गुजरातमध्ये पाहायला मिळतंय तेच चित्र गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीत दिसत आहे. पण दिल्लीतल्या पुराचं कारण पाऊस नसून यमुना नदीच्या पाणी पातळीत झालेली वाढ आहेकाही ठिकाणी आता कुठे पाणी ओसरत होतं. तोवर पुन्हा एकदा दिल्लीवर पुराचं संकट दाटलंय. यमुनेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झालीये.त्यामुळे पुन्हा दिल्ली बुडणार का? अशी चिंता दिल्लीकरांना सतावत आहे. तर तिकडे जम्मू काश्मिरच्या कुपवाडा जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढलंय. अनेक घरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला.
मध्य प्रदेशातही पावसाचा कहर
मध्य प्रदेशातील अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नागरिक त्रस्त आहेत. सिहोरमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिहोरमध्ये एक कार्यक्रम सुरु असताना सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला. यामध्ये 14 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून बाधित भागातील वीज खंडित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पावसामुळे पूरस्थिती
महाराष्ट्रात यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीये. यवतमाळच्या महागावत तालुक्यातील अनंतवाडी गावाला पुराने वेढलं. गावकऱ्यांना आता सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलंय अनेक राज्यांना पावसाने गाठलंय पुढचे काही दिवस वादळी पावसाचे असल्याचाच अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कर्नाटकात पूरस्थिती
कर्नाटकातही मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात पूर आणि मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पूरग्रस्त भागावर लक्ष ठेवून आहेत. लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने 500 कोटी रुपयींची मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्त भागात शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत