India on WHO Statement : भारताने देशातील कोविड-19 मृत्यू दराचे आकलन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताने म्हटले आहे की, मोठी लोकसंख्या आणि मोठा भौगोलिक आकार असलेल्या भारत देशाच्या मृत्यू संख्येचे आकलन करण्यासाठी असे गणितीय मॉडेल वापरले जाऊ शकत नाही.


WHO ने भारतावर प्रश्न उपस्थित केले


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या 'जागतिक कोविड मृत्यूची संख्या सार्वजनिक करण्याच्या WHOच्या प्रयत्नात भारत अडथळा आणत आहे' या शीर्षकाच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या लेखाला उत्तर देताना भारताच्या मंत्रालयाने म्हटले आहे की, जागतिक आरोग्य संस्थेद्वारे (WHO) अवलंबल्या जात असलेल्या कार्यपद्धतीबद्दल देशाने अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे


भारताने 'या' पद्धतीवर चिंता व्यक्त केली
मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, "भारताचा मूळ आक्षेप निकालावर नाही तर अवलंबलेल्या कार्यपद्धतीवर आहे."आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारताने इतर सदस्य देशांसोबत WHO ला सहा पत्रांसह अनेक औपचारिक संदेशांद्वारे चिंता व्यक्त केली आहे.


भारतात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट


देशात कोरोना संसर्गबाधितांच्या संख्येत आज वाढ झाल्याचे दिसून आले. देशात मागील 24 तासात कोरोना विषाणूचे 1150 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. तर, चार संसर्गबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून 11 हजार 558 इतकी झाली आहे. या महासाथीमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 751 इतकी झाली आहे. आकडेवारींनुसार, आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 8 हजार 788 इतक्या कोरोनाबाधितांनी आजारावर मात केली आहे. देशात 4 कोटी 30 लाख 31 हजार 958 जणांना कोरोनाची लागण झाली होती. 


आतापर्यंत लशीचे 186 कोटींचे डोस 


राष्ट्रीय लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत  आतापर्यंत देशात कोरोना प्रतिबंधक लशीचे 186 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहे. शनिवारी, 12 लाख 56 हजार 533 इतके डोस देण्यात आले. त्यानंतर आता देशात 186 कोटी 51 लाख 53  हजार डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  आरोग्य कर्मचारी, कोव्हिड योद्धा आणि 60 वर्षांवरील अधिक वयाच्या नागरिकांना 2 कोटींहून अधिक बुस्टर डोस देण्यात आले आहेत. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली होती. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात होते.