Coronavirus Updates : देशात कोरोना संसर्गबाधितांच्या संख्येत आज वाढ झाल्याचे दिसून आले. देशात मागील 24 तासात कोरोना विषाणूचे 1150 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. तर, चार संसर्गबाधितांचा मृत्यू झाला आहे. 


सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून 11 हजार 558 इतकी झाली आहे. या महासाथीमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 751 इतकी झाली आहे. आकडेवारींनुसार, आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 8 हजार 788 इतक्या कोरोनाबाधितांनी आजारावर मात केली आहे. देशात 4 कोटी 30 लाख 31 हजार 958 जणांना कोरोनाची लागण झाली होती. 


आतापर्यंत लशीचे 186 कोटींचे डोस 


राष्ट्रीय लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत  आतापर्यंत देशात कोरोना प्रतिबंधक लशीचे 186 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहे. शनिवारी, 12 लाख 56 हजार 533 इतके डोस देण्यात आले. त्यानंतर आता देशात 186 कोटी 51 लाख 53  हजार डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,  आरोग्य कर्मचारी, कोव्हिड योद्धा आणि 60 वर्षांवरील अधिक वयाच्या नागरिकांना 2 कोटींहून अधिक बुस्टर डोस देण्यात आले आहेत. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारी 2021 पासून सुरू झाली होती. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात होते. 


शनिवारी मुंबईत 43 नव्या रुग्णांची भर, 329 सक्रिय रुग्ण


मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायाला मिळत आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी मुंबईत 43 नव्या रुग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी मुंबईत 44 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. 


मुंबईमध्ये शनिवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 55 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 329 इतके सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,38,819 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 15,187 इतका झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.004 टक्के इतका आहे.