नवी दिल्ली : किर्गिजस्तानच्या बिश्केकमधील परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी बोलणं टाळलं. एससीओ परिषदेनंतर झालेल्या डिनरमध्ये सर्व देशांचे प्रमुख बसले असताना मोदी आणि इम्रान खान यांच्यातील दरी जाणवली.


डिनरच्या वेळी नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांच्या बाजूला बसणंही टाळलं. इम्रान खान यांच्यासोबत ना त्यांनी हस्तांदोलन केलं, ना कुठली चर्चा केली. इतकंच काय, मोदींनी इम्रान खान यांच्याकडे साधं ढुंकूनही पाहिलं नाही. मोदींनी पाकिस्तानला दिलेली वागणूक इम्रान खान कायम लक्षात ठेवतील, अशीच होती.

दरम्यान, एससीओ परिषदेआधी मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेदरम्यान चीनने पाकिस्तानसोबतच्या चर्चेचा मुद्दा समोर ठेवला, मात्र सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानसोबत कुठलीही चर्चा शक्य नसल्याचं मोदींनी ठणकावून सांगितलं.



पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कुठलीही कारवाई केलेली नाही. भारताने दबाव टाकल्यानंतर मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्यात आलं. त्यामुळे पाकिस्तानसोबत चर्चेचा प्रश्नच येत नाही, असं मोदी म्हणाले. त्यानंतर मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली.

एससीओ परिषद काय आहे?

एससीओ म्हणजेच शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात सहकार संघटन संमेलन. एससीओ ही राजकीय आणि सुरक्षा संघटना आहे. या संघटनेचं मुख्यालय चीनच्या बीजिंगमध्ये आहे. 2001 मध्ये ही संघटना निर्माण झाली.

चीन, रशिया, कजाकिस्तान, उज्बेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिझस्तान हे संघटनेचे सदस्य आहेत. भारत आणि पाकिस्तान 2017 पासून संघटनेचे सदस्य झाले आहेत. सदस्य देशांचे सैन्य, आर्थिक मदत, गुप्त माहितीची देवाणघेवाण, मध्य आशियातील दहशतवादाविरोधात मोहीम अशा मुद्द्यांवर चर्चा होते.