Miss World 2023: मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने यंदाच्या 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेच्या यजमानपदाची जबाबदारी भारताकडे दिली आहे. भारताला लाभलेला सांस्कृतिक वारसा, इथल्या विविधतेला प्रोत्साहन देणारी देशीचा बांधिलकी तसेच महिला सक्षमीकरण करण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न यामुळे देशाला हा बहुमान मिळाला असल्याचं सांगितलं जात आहे. याआधी 1996 साली मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते. त्यामुळे तब्बल 27 वर्षांनी हा बहुमान देशाला मिळाला आहे. 


देशाची परंपरा, संस्कृती आणि इतिहासामुळे भारत हा फॅशनचे जागतिक केंद्र म्हणून नावारुपाला आहे. यंदाची मिस वर्ल्ड स्पर्धा ही सामाजिक कार्यांना उत्तेजन देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे समाजासाठी योगदान देण्यास प्रेरणा देखील या माध्यमातून देण्यात येणार आहे. ऐश्वर्या राय- बच्चन, प्रियंका चोप्रा, युक्ता मुखी देशाच्या यांसारख्या देशाच्या लेकींनी आतापर्यंत या सन्मावर आपले नाव कोरले आहे. 


'भारताच्या विवधेतेची जगाला ओळख करुन देण्यास उत्सुक'


मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्ष  जुलिया मोर्ली यावेळी म्हणाल्या की, ' 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेची अंतिम फेरी भारतात होणार आहे, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे.'  त्यांनी भारताविषयी आठवण सांगताना म्हटलं की. '30 वर्षांपूर्वी मी जेव्हा पहिल्यांदा भारताला भेट दिली त्या क्षणापासून मला या देशाबद्दल खूप जिव्हाळा वाटत आला आहे.  तुमची वैविध्यपूर्ण संस्कृती, जागतिक दर्जाची आकर्षणे, मनमोहक पर्यटनस्थळांची माहिती संपूर्ण जगाला करुन देण्यास आता आम्ही उत्सुक आहोत.'


यंदाच्या मिस वर्ल्ड फेस्टिवलसाठी मिस वर्ल्ड लिमिटेड व पीएमई एण्टरटेन्मेंट या संस्था एकत्र येऊन काम करणार असल्याचा माहिती यावेळी  जुलिया मोर्ली यांनी दिली. तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'मिस वर्ल्डस्पर्धेमध्ये, 130 देशातील स्पर्धकांमधील विजेत्या स्पर्धकाचा  भारतातील प्रवास  दाखवला जाणार आहे. मिस वर्ल्डस्पर्धेच्या अंतिम फेरीदरम्यान आम्ही हा प्रवास दाखवणार आहोत.' तसेच त्यांनी यावेळी डॉ. सयद झफर इस्लाम यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांचे देखील आभार मानले आहेत. 


यंदा मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी 130 पेक्षा अधिक देशातील स्पर्धक भारतात एकत्र येणार आहेत. तसेच त्यांच्या  प्रतिभेचे, बुद्धिमत्तेचे दर्शन यावेळी हे स्पर्धक सर्वांना करुन देणार आहेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2023 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. स्त्रियांच्या सौंदर्य व बुद्धीचा गौरव करणे हा मिस वर्ल्ड या किताबाचा मुख्य उद्दिष्ट असतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kajol: काजोलनं घेतला मोठा निर्णय; पोस्ट शेअर करत म्हणाली, 'आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात आहे....'