Wrestlers Protest : कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात कुस्तीपटूंचा (Wrestler Protest) संघर्ष अजूनही आहे. परंतु सरकारसोबत चर्चा केल्यानंतर कुस्तीपटूंनी त्यांचे आंदोलन स्थगित केले आहे. यादरम्यान कुस्तीपटूंनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरत आहे. दरम्यान या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी (9 जून) पटियाला हाऊस कोर्टात कारवाईचा अहवाल (अॅक्शन टेकन रिपोर्ट) (ATR) दाखल केला आहे. तसेच या अहवालात म्हटले आहे की, "जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक भाषण केल्याची घटना घडली नाही." 


कुस्तीपटूंनी 23 एप्रिल 2023 ते 28 मे पर्यंत नवी दिल्ली मधील जंतर मंतर याठिकाणी आंदोलन केले. याचदरम्यान त्यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये म्हटले आहे की, "कुस्तीपटूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता आणि हा प्रकार हेट स्पीच गुन्ह्याअंतर्गत येतो." या प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाने दिल्ली पोलिसांना 9 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी वेळेच्या आत कोर्टात स्टेटस रिपोर्ट सादर केला. कोर्टाने या अहवालाची नोंद केली असून याप्रकरणी 7 जुलै रोजी सुनावणी करण्यात येईल. 


दिल्ली पोलिसांच्या अहवालात काय म्हटलं? 


पटियाला हाऊस कोर्टात सादर केलेल्या अहवालात दिल्ली पोलिसांनी म्हटल की, "तक्रारदारांकडून दाखवण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये काही शिख आंदोलकांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. परंतु या व्हिडीओमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगाट तसेच इतर कोणतेही कुस्तीपटू अशी घोषणाबाजी करताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारचा हेटस्पीचचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. त्यामुळे न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटळण्यात यावी."


याशिवाय दिल्ली पोलिसांनी सांगितले की, "तक्रादारांनी केलेल्या अन्य दोन आरोपांचा प्रश्न आता आहे. त्यासंदर्भात चौकशी करण्यास कनॉट प्लस पोलीस स्थानकात या तक्रारी वर्ग करण्यात आल्या आहेत." यामध्ये तक्रादारांनी म्हटलं आहे की, "कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर खोटे आरोप केले आहेत. त्यामुळे आता यावर न्यायालयाकडून काय निर्णय देण्यात येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे." 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Wrestlers Protest: बृजभूषण यांच्याविरोधात सूड भावनेनं खोटी तक्रार; अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांची माध्यमांसमोर कबुली