नवी दिल्ली : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी भारताकडून प्रजासत्ताक दिनाचं (Republic Day) निमंत्रण देण्यात आलं आहे. हे निमंत्रण मिळाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे आभार मानलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या ऐवजी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ट्विट करत यासंदर्भात भाष्य केलंय. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, भारताने निमंत्रण दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माझे प्रिय मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुमच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा आंनदोत्सव मी तुमच्यासोबत साजरा करेन. त्यामुळे इमॅन्युएल मॅक्रॉन हे या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान मोदी हे अतिथी म्हणून उपस्थित होते
अलिकडच्या वर्षांमध्ये भारत आणि फ्रान्समधील संबंधांमध्ये प्रगती झाल्याचं पाहायला मिळतं. या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात बॅस्टिल डे परेडमध्ये सन्माननीय पाहुणे म्हणून भाग घेतला होता. त्याचवेळी, संरक्षण मंत्रालयाने स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांत या विमानवाहू जहाजावर तैनात करण्याच्या उद्देशाने फ्रान्सकडून 26 राफेल (सागरी) जेट खरेदी करण्यास मान्यता दिली होती. भारताने विमाने खरेदी करण्याच्या सुरुवातीच्या निविदांना आणि फ्रान्सने प्रतिसाद दिला दोन्ही देश सागरी क्षेत्रात, विशेषत: हिंदी महासागर क्षेत्रात सहकार्य वाढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
'जो बायडेन' का उपस्थित राहणार नाही?
भारताच्या प्रजासत्ताक दिनी जो बायडेन हे भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार नाहीत. बायडेन यांच्या व्यस्त दिनक्रमामुळे त्यांना उपस्थित राहता येणार नसल्याची माहिती समोर आलीये. त्याच दिवशी त्यांना स्टेट ऑफ द युनियनला संबोधित करायचे आहे. तसेच त्यांना पुढील वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांची देखील तयारी करायची आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांना उपस्थित राहता येणार नसल्याची माहिती देण्यात आलीये.