नवी दिल्ली : देशाभिमान उंचावणारा आजचा दिवस आहे. 16 डिसेंबर 1971 साली भारताने पाकिस्तानला युद्धात हरवलं होतं. त्या दिवसाला आज 46 वर्षे पूर्ण झाली आहेत.


पाकिस्तानचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल आमिर अब्‍दुल्‍ला खान नियाजी यांनी ढाक्याच्या रेसकोर्स मैदानावर आपल्या 93 हजार सैनिकांसोबत, भारतीय सैन्याचे कमांडर जनरल जगजीत सिंहअरोरा यांच्यासमोर शरणागती पत्कारली होती. या युद्धाचा परिणाम म्हणजे पाकिस्तानचा एक भाग त्यांच्यापासून वेगळा झाला आणि बांगलादेश हा नवा देश अस्तित्त्वात आला.

या युद्धात सहभागी असलेले मेरठचे ब्रिगेडियर रणवीर सिंह यांच्या माहितीनुसार, "पूर्व पाकिस्तानमधील बंगाली राष्ट्रवादी स्वतंत्र देशाची मागणी करत होते. 1970 मधील पाकिस्तानच्या लोकसभा निवडणुकीनंतर संघर्ष वाढला. परिणामी 25 मार्च 1971 रोजी पश्चिम पाकिस्तानने हे आंदोलन चिरडण्यासाठी ऑपेरशन सर्चलाईट सुरु केलं. मात्र पूर्व पाकिस्तानमध्ये विरोध वाढला आणि बांगलादेश मुक्तीबाहिनी नावाचा सशस्त्र दल बनवून हे आंदोलक पाकिस्तानी सैन्याला विरोध करु लागले. यामध्ये भारताने बांगलादेशी राष्ट्रवाद्यांच्या कुटनीती, आर्थिक आणि सैन्याला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं."

यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात युद्ध छेडत हवाई हल्ला केला. पाकिस्तानने ऑपरेशन चंगेज खान अंतर्गत भारताच्या 11 हवाईतळावर हल्ला केला. त्यानंतर 3 डिसेंबर 1971 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाला सुरुवात झाली. भारताने पूर्व पाकिस्तानमध्ये बांगलादेश मुक्तीबाहिनीला साथ दिली. अखेर 13 दिवसांनंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल आमिर अब्‍दुल्‍ला खान नियाजी यांनी आपल्या 93 हजार सैनिकांसोबत, भारतासमोर शरणागती पत्कारली.

या युद्धाने दक्षिण आशियाचं भू-राजकीय परीक्षेत्र बदललं आणि बांगलादेश हा नवा देश जगाच्या नकाशावर अस्तित्त्वात आलं. 1972 मध्ये संयुक्त राष्ट्रांमधी बहुतांश सदस्य देशांनी बांगलादेशला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली.

या युद्धात भारताच्या तब्बल चार हजार सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर दहा हजार सैनिक जखमी झाले होते. याचीच आठवण म्हणून आज देशभर हा दिवस साजरा केला जातो.

विजय दिवसाला दिल्लीतल्या इंडिया गेटवर अमर जवान ज्योतीला पंतप्रधानांसह राष्ट्रपती सलामी देतात आणि युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहतात.