India expelled Canadian Diplomats : कॅनडाच्या सरकारसोबत निर्माण झालेल्या ताज्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने 6 कॅनडाच्या मुत्सद्दींची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना शनिवारी, 19 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11:59 वा त्यापूर्वी भारत सोडावा लागेल. भारत सरकारने कॅनडातून आपल्या राजदूतांनाही परत बोलावले आहे. खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येच्या तपासाशी या अधिकाऱ्यांना जोडण्याच्या कॅनडाच्या प्रयत्नांना प्रत्युत्तर म्हणून भारताने ही कारवाई केली आहे.


खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून तणाव


खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून गेल्या वर्षभरापासून भारत-कॅनडामध्ये तणाव वाढलेला आहे. त्याचवेळी आता कॅनडाने निज्जरच्या हत्येचा तपास करताना, थेट कॅनडातील भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतरांना गोवण्याचा प्रयत्न केला. कॅनडाच्या या आरोपांनंतर भारताने एक पत्रक प्रसिद्ध करून खडसावले. तसंच तात्काळ प्रभावाने कॅनडात काम करणाऱ्या भारतीय उच्चायुक्तांना मायदेशी बोलावले. त्यामुळे आता कॅनडात भारतीय उच्चायुक्त काम करणार नाहीत. 


भारताविरोधी कारवाया कॅनडाने थांबवल्या नाहीत, तर भविष्यात आणखी कठोर कारवाई करू असा इशारादेखील भारताने दिला. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी लाओसमध्ये पार पडलेल्या, आशियान शिखर परिषदेमध्ये, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंची भेट घेतली होती. जून २०२३ मध्ये ब्रिटिश कोलंबियातील गुरुद्वाराबाहेर झालेल्या निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला होता.


कॅनडाच्या सरकारच्या वचनबद्धतेवर आमचा विश्वास नाही: परराष्ट्र मंत्रालय


परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "अतिरेकी आणि हिंसाचाराच्या वातावरणात कॅनडाच्या ट्रूडो सरकारच्या कृतींमुळे भारतीय अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या सध्याच्या कॅनडाच्या सरकारच्या वचनबद्धतेबद्दल आम्हाला कोणतेही आश्वासन नाही. म्हणून भारत सरकारने उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे." 


भारतातून कोणत्या कॅनेडियन राजनयिकांची हकालपट्टी करण्यात आली?


भारत सरकारने निष्कासित केलेल्या कॅनडाच्या मुत्सद्दींमध्ये कार्यवाहक उच्चायुक्त स्टीवर्ट रॉस व्हीलर, उप उच्चायुक्त पॅट्रिक हेबर्ट, प्रथम सचिव मेरी कॅथरीन जोली, प्रथम सचिव लॅन रॉस डेव्हिड ट्राइट्स, प्रथम सचिव ॲडम जेम्स चुइप्का आणि प्रथम सचिव पॉला ओरजुएला यांचा समावेश आहे.


ही बातमी वाचा: