Sri Lanka Crisis : कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तांनी (Indian High Commission) राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) आणि त्यांचे भाऊ बासिल राजपक्षे यांना देशातून पळून जाण्यास भारताने मदत केल्याचा दावा करणारे वृत्त फेटाळून लावले आहे. भारत श्रीलंकेतील लोकांना पाठिंबा देत राहील, असे उच्चायुक्तांनी सांगितले. राष्ट्रपती राजपक्षे श्रीलंकेतून पळून मालदीवमध्ये पोहोचले आहेत. श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयानेही राजपक्षेंनी देश सोडल्याची पुष्टी केली आहे.


भारतीय उच्चायुक्तांचे ट्विट


भारतीय उच्चायुक्तांनी बुधवारी ट्विट केले की, "उच्चायुक्तालयाने गोटाबाया राजपक्षे आणि बेसिल राजपक्षे यांच्या श्रीलंकेतून नुकत्याच केलेल्या पलायनासाठी भारताने सुविधा दिल्याच्या वृत्तांचे खंडन केले. भारत श्रीलंकेतील जनतेला पाठिंबा देत राहील. कारण त्यांना लोकशाही मार्ग, मूल्ये, प्रस्थापित लोकशाही संस्था आणि घटनात्मक चौकट यातून समृद्धी आणि प्रगतीच्या त्यांच्या आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत.


गोटाबाया बुधवारी पहाटे पळून गेले
सुत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे बुधवारी पहाटे देश सोडून पळून गेले. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसने एकै इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, राष्ट्रपती, त्यांची पत्नी आणि दोन सुरक्षारक्षक श्रीलंकेच्या हवाई दलाच्या विमानात बसून मालदीवकडे रवाना झाले.


अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित
राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांनी 13 जुलै रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. आता ते देश सोडून पळून गेल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, मंगळवारी राजपक्षे यांनी राजीनामा पत्रावर स्वाक्षरी केल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे.