Cervical Cancer Vaccine : भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने (Indian Cervical Cancer Vaccine) मृत्यू होतो. भारतात, हा महिलांमध्ये दुसरा सर्वात घातक आजार आहे. यावर मात करत आता एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता गर्भाशयाच्या कर्करोगाची लस भारतातच बनवली जाणार आहे. यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ला ही लस तयार करण्यास मान्यता दिली. यानंतर आता भारतातील पहिल्या क्वाड्रिवेलेंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस वॅक्सिन (qHPV) चे उत्पादन सुरू होईल आणि लवकरच जनसामान्यांना परवडणारी ही लस बाजारात उपलब्ध होईल.


 






अदर पूनावाला यांनी ट्विट करत दिली माहिती
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी प्रथमच भारतीय HPV लस बनवली जाईल, जी स्वस्त आणि सहज उपलब्ध असेल. आम्ही या वर्षाच्या शेवटी ते लॉन्च करण्यास उत्सुक आहोत, तसेच आम्ही DCGI चे आभार मानतो.


महिलांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी क्रांतिकारी पाऊल


दरम्यान, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे महिलांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी हे एक क्रांतिकारी पाऊल ठरेल. यावर SII चे सरकारी आणि नियामक प्रकरणांचे संचालक, प्रकाश कुमार सिंग यांनी 8 जून रोजी भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरल यांच्याकडे  HPV लसीच्या फेज 2 आणि 3 च्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्यानंतर अधिकृततेसाठी अर्ज केला होता.


लोकांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध होणार
 सीरम इन्स्टिट्यूटच्या अर्जात म्हटले आहे की, "हे देखील नमूद करण्यासारखे आहे की सध्या आपला देश एचपीव्ही लसीसाठी पूर्णपणे परदेशी उत्पादकांवर अवलंबून आहे. आमच्या गटाच्या तत्त्वज्ञानानुसार आणि आमचे सीईओ डॉ. अदर पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली, आमचे उच्च दर्जाच्या 'मेड इन इंडिया' लस आपल्या देशातील आणि जगभरातील लोकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे."