PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी झारखंडच्या देवघर इथे, 16,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी झारखंडचे राज्यपाल, रमेश बैस, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, राज्यातील मंत्री आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बाबा बैद्यनाथ यांच्या कृपेने, आज 16,000 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी आज इथे करण्यात आली, असे पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले. या सर्व प्रकल्पांमुळे झारखंडमध्ये दळणवळणाच्या आधुनिक सोयीसुविधा, ऊर्जा, आरोग्य, श्रद्धास्थाने आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपासून, राज्यांचा विकास करून त्यातून राष्ट्राचा विकास करण्याच्या तत्वावर देश काम करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 8 वर्षात झारखंडला महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग, जलमार्ग या सर्व मार्गांनी जोडण्याच्या प्रयत्नामागेही, हाच विचार आणि तत्व प्राधान्याने आहे. या सर्व सुविधांचा राज्याच्या आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होईल. झारखंडला आज दुसरे विमानतळ मिळाले आहे. यामुळे बाबा बैद्यनाथ यांच्या भक्तांची मोठी सोय होणार आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
दळणवळणाच्या सुविधा वाढवण्यासोबतच, केंद्र सरकार, देशातील श्रद्धा आणि अध्यात्माशी संबंधित महत्त्वाच्या तीर्थक्षेत्री सुविधा निर्माण करण्यावरही भर देत आहे. ‘प्रसाद’ योजने अंतर्गत बाबा बैद्यनाथ धाममध्ये आधुनिक सुविधांचा विस्तार करण्यात आला आहे. जेव्हा सर्वांगीण दृष्टीकोन ठेवून प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाते, तेव्हा त्यातून, समाजातील विविध घटकांसाठी उत्पन्नाचे नवनवीन मार्ग निर्माण होतात तसेच नव्या सुविधा नवीन संधी निर्माण करतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
झारखंड सारख्या राज्यासाठी गॅस-आधारित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याचे लाभही पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले. पंतप्रधान ऊर्जा गंगा योजनेमुळे जुने चित्र बदलत आहेम असे ते म्हणाले. अभावांचे संधीत रूपांतर करण्यासाठी सरकार अनेक ऐतिहासिक निर्णय घेत आहे असे त्यांनी सांगितले. GAIL च्या जगदीशपूर-हल्दिया-बोकारो-धामरा पाइपलाइनच्या झारखंडमधील बोकारो-अंगुल विभागामार्फत ओदिशाच्या अकरा जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरण नेटवर्कचा विस्तार होईल, असेही त्यांनी सांगितले.