नवी दिल्ली : भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील सीमासंघर्ष सर्वज्ञात आहे. फक्त सीमेवरच नाही तर, चीन सागरी सीमा ओलांडूनही वेळोवेळी कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. या कुरापती करणाऱ्या चीनचा बंदोबस्त करण्यासाठी भारताचं समुद्री ताकद आणखी वाढवण्यात येणार आहे. भारतीय नौदलामध्ये (Indian Navy) नवीन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा युद्धनौका सामील करण्यात येणार आहेत. हिंद महासागर आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात आगामी काळातील कुरघोडींचा धोका पाहता भारतीय नौदलानं हे मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.
भारताची समुद्री ताकद वाढणार!
भारत आणि चीनमध्ये सीमासंघर्षासोबतच सागरी क्षेत्रातही संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये हिंद महासागर क्षेत्रात स्पर्धा आहे. भारत सध्या लष्करी सामर्थ्य वाढवण्यावर भर देत असताना नौदलाची ताकद वाढवण्याचाही प्रयत्न करत आहे. भारतीय नौदलाने 68 युद्धनौका आणि जहाजांचा प्रस्ताव मंजूर केला असून त्यांची ऑर्डरही देण्यात आली आहे. नौदलामध्ये आगामी काळात 2 लाख कोटी रुपये किमतीची आधुनिक जहाजे आणि युद्धनौका यांचा समावेश होईल. चीनची सागरी क्षेत्रातील कुरघोडी रोखण्यासाठी भारतीय नौदल प्रयत्नशील आहे.
चीनची सागरी क्षेत्रातील कुरघोडी रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल
केंद्राकडून नौदलाला 143 विमाने आणि 130 हेलिकॉप्टर तसेच 132 युद्धनौका खरेदीची परवानगीही मिळाली आहे. याशिवाय 8 नेक्स्ट जनरेशन कॉर्वेट्स म्हणजेच लहान युद्धनौका, नऊ पाणबुड्या, पाच सर्वेक्षण जहाजे आणि दोन बहुउद्देशीय जहाजे बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. येत्या काही वर्षांत हे तयार केले जातील. जरी नौदल बजेटच्या अडचणी, डिकमिशनिंग आणि भारतीय शिपयार्ड्सच्या संथपणाशी झुंजत आहे. पण 2030 पर्यंत नौदल आणखी मजबूत होऊन 155 ते 160 युद्धनौका असतील.
175 युद्धनौका नौदलात समावेश करण्याचं लक्ष्य
टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदलाचे खरे उद्दिष्ट 2035 पर्यंत आपल्या ताफ्यात किमान 175 युद्धनौका समाविष्ट करणं आहे. यामुळे हिंदी महासागरातील भारताची पोहोच आणखी मजबूत करता येईल. तसेच यासोबतच नौदलाची विमाने, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोनची संख्या वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.
चीनकडून वाढता धोका
समुद्रात चीनचा वाढता धोका दुर्लक्षित करता येणार नाही. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी-नेव्हीला हिंद महासागर आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात सध्याच्या लॉजिस्टिक आव्हानावर मात करायची आहे. आफ्रिकेच्या हॉर्नमधील जिबूती, पाकिस्तानमधील कराची आणि ग्वादर येथे त्यांनी आपले तळ स्थापन केले आहेत. असे मानले जात आहे की लवकरच चीनी नौदल देखील कंबोडियातील रेममध्ये आपला परदेशी तळ तयार करेल. प्रत्येक समुद्रात आपली पकड मजबूत करणं हा त्याचा उद्देश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :