नवी दिल्ली : सध्या काश्मीर खोऱ्यात (Kashmir) तणाव पाहायला मिळत आहे. जम्मू आणि काश्मीर (Jammu Kashmir) मध्ये सैन्य दल (Indian Army) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून (Jammu-Kashmir Police) शोधमोहिम (Search Operation) राबवली जात आहे. अनेक भागात दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक (Terrorist Attack) पार पडली आहे. सैन्य दलाने काही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. आता केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांच्या पार्श्मभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF-Central Reserve Police Force) च्या कोब्रा कमांडोचं पथक (CRPF Cobra Commando) कुपवाडा जिल्ह्यात तैनात करण्यात आलं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आता CRPF जवानांची नजर!
माओवाद्यांशी लढण्यासाठी 2009 मध्ये कमांडो बटालियन फॉर रेजोल्यूट अॅक्शन (CoBRA) या स्वतंत्र दलाची निर्मिती करण्यात आली होती. निर्मितीनंतर पहिल्यांदा कोब्रा पथकाला पूर्व आणि मध्य भागातून हटवून जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलं आहे. कोब्रा कमांडोच्या पहिल्या पथकाने जम्मू आणि काश्मीर खोऱ्यांमधील जंगलामध्ये प्रशिक्षण पूर्ण केलं असून त्यानंतर या पथकाला कुपवाडा जिल्ह्यात तैनात करण्यात आलं आहे.
कोब्रा कमांडोच्या पथकांचं सहा महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवादी कारवाया आता काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे तेथील कोब्रा कमांडोच्या काही पथकांना काही काळासाठी हटवण्यात आलं आहे. त्यानंतर या पथकांना जम्मू आणि काश्मीर येथे तैनात करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं. कोब्रा कमांडोच्या या पथकांनी सहा महिन्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. मात्र, त्यांचा अद्याप कोणत्याही मोहिमेत वापर करण्यात आलेला नाही. हिंदुस्तान टाईम्सने या संदर्भात माहिती दिली आहे.
एप्रिलमध्ये जम्मू-काश्मीरला रवाना
सीआरपीएफ कोब्रा कमांडोचं पथक एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये पाठवण्यात आले होते. काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवान (CRPF) दहशतवादविरोधी कारवाया तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. सीआरपीएफ जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय सैन्य दलासोबत मिळून काम करत आहे.
अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिक माहिती देत सांगितलं की, "देशातील अंतर्गत नक्षलवादी कारवायांमध्ये वाढ झाल्याने भारताची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली होती, त्यावेळी कोब्रा कमांडो दलाची स्थापना करण्यात आली. गेल्या काही वर्षात कोब्रा कमांडोच्या पथकांनी अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यांच्या मोहिमांमुळे नक्षलवादी हिंसाचार कमी झाला आहे. जंगल आणि डोंगराळ भागात दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यात कोब्रा कमांडो तरबेज आहेत. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील भागातील परिस्थिती जवळपास सारखीच आहेत. येत्या काही वर्षांत कोब्रा कमांडोंचा अशा इतर ठिकाणीही सुरक्षेसाठी तैनाती करण्यात येईल."