नवी दिल्ली : संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला (Parliament Special Session) आजपासून सुरु होत आहे. परंतु अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मीडियाला संबोधित केलं. हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचं असेल, असं सूचक वक्तव्य पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान 3 आणि G-20 शिखर संमेलनाच्या यशाचं उल्लेख करताना भारताचं सामर्थ्य संपूर्ण जगाने पाहिल्याचं म्हटलं. पंतप्रधान म्हणाले की, "मून मिशनचे यश... चांद्रयान-3, आपला तिरंगा फडकवत आहे. शिवशक्ती पॉईंट नवीन प्रेरणा केंद्र बनलं आहे. या पॉईंटमुळे आपला ऊर अभिमानाने भरला आहे."


"भारताला अभिमान वाटावा असे क्षण एकामागून एक आले आहेत. संपूर्ण देशात उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण आपण अनुभवत आहोत. त्याचवेळी संसदेचे हे अधिवेशन होत आहे. हे सत्र लहान असले तरी वेळेच्या दृष्टीने खूप मोठं आहे. हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचं असेल," असं मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "उद्या गणेश चतुर्थीला आम्ही नवीन संसदेत जाऊ. भगवान गणेशाला 'विघ्नहर्ता' म्हणूनही ओळखले जाते, आता देशाच्या विकासात कोणतेही अडथळे येणार नाहीत. संसदेचे हे अधिवेशन लहान असले तरी ते ऐतिहासिक आहे."






विशेष अधिवेशनात काय होणार?


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी लोकसभेत बोलणार आहेत. सरकारच्या अजेंड्यानुसार या अधिवेशनात एकूण आठ विधेयकं मांडली जाणार आहेत. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंबंधीचे विधेयक प्रमुख आहे. महिलांना आरक्षण देणारं विधेयक लोकसभेतही मांडलं जाऊ शकतं. समान नागरी कायदा आणि देशाचं नाव बदलण्याबाबतही चर्चा आहे. दरम्यान आजची बैठक जुन्या इमारतीत होणार आहे. सेंट्रल हॉलमधील समारंभानंतर विद्यमान संसद नवीन इमारतीत हस्तांतरित केली जाईल. लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व सदस्यांना मंगळवारी (19 सप्टेंबर) सकाळी सामूहिक छायाचित्रासाठी बोलावण्यात आलं आहे. 20 सप्टेंबरपासून नवीन संसद भवनात सरकारचे विधिमंडळ कामकाज सुरु होणार आहे. हे नियमित अधिवेशन आहे, म्हणजे सध्याचे लोकसभेचे तेरावं अधिवेशन आणि राज्यसभेचं 261 वं अधिवेशन. 


हेही वाचा


Parliament Special Session : संसदेच्या विशेष अधिवेशन आजपासून सुरु होणार, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? पाच दिवसांसाठी काय आहे सरकारची तयारी?