मोदींचा मूड नेमका कसा आहे हे जाणून घ्यायला ट्रम्प महाशयांची मोदींसोबत चर्चा तरी व्हायला हवी होती. पण भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय की या दोन नेत्यांमध्ये अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात शेवटचा संवाद 4 एप्रिल रोजी झाला.जेव्हा अमेरिकेला हव्या असलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनसंदर्भातली चर्चा सुरु होती. त्यानंतर त्यांच्यात कुठलाही फोनवरुन संवाद नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. साहजिकच ट्रम्प यांच्या मध्यस्थीसाठी भारत काही अमेरिकेच्या दारात गेलेला नाही हे ठासून सांगण्यासाठीच सरकारनं हे तातडीनं स्पष्ट केलं.
दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारत चीन तणावात अमेरिका मध्यस्थी करायला उत्सुक असल्याचं आणि तसं आपण दोन देशांना कळवलं असल्याचंही वक्तव्य केलं होतं. लडाखमधल्या सैन्य तैनातीवरुन भारत आणि चीनमधला संघर्ष 6 मे पासून वाढलेला आहे. जवळपास 10 हजार सैनिक एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. नेपाळलाही चीन भारताच्या विरोधात चिथावत असल्याचं दिसतंय. पण ही सगळी परिस्थिती हाताळताना भारतानं जे अधिकृत वक्तव्य केलं त्यात धोरणात्मक कणखरता दाखवली होती.
भारत चीन सीमेवर लाईन ऑफ कंट्रोलमध्ये कुठलाही बदल भारत स्वीकारणार नाही. दोन्ही देशांमध्ये प्रशासनिक, लष्करी पातळीवरचा संपर्क कायम आहे. दोन्ही देशांनी याबाबत अनेकदा वेगवेगळे करारही केले आहेत. कोरोनाशी युद्ध चालू असताना चीनसोबत वाढलेला तणाव ही देखील भारतासाठी चिंतेची बाब आहे. पण कुठल्याही पद्धतीनं यात दुसऱ्या देशाची मध्यस्थी भारताला नको आहे.
काश्मीर प्रश्नावरुनही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अशीच मध्यस्थीची विनंती केली होती. पाकिस्तानसोबत एक विधान, भारतासोबत दुसरंच विधान असेही प्रकार त्यांनी केले आहेत. आता तर चक्क न झालेल्या संभाषणावरुनच भारताचं काय मत आहे हे ते सांगत असतील तर कठीण आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेचा अध्यक्ष बिनदिक्कत खोटं बोलतोय की काय असाही सवाल त्यामुळे उपस्थित होतो.