मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई आणि राज्याच्या बहुतांश भागांमध्ये कोरोना रुग्णसंख्या अतिशय झपाट्याने वाढू लागली आहे. परिणामी नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळं प्रशासन पुन्हा एकदा लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतं, असे संकेत आता देण्यात आले आहेत. मुंबईच्या महापौर, किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली.


कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे नाईलाजास्तव राज्य प्रशासनाला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागू शकतो. कोरोना रुग्णसंख्याच नव्हे, तर या विषाणूच्या संसर्गामुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळंच काळजीपोटी लॉकडाऊनच्या दिशेनं जावं लागण्याची चिंता राज्य शासनानं व्यक्त केली आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.


Corona Warning | कोरोनाला हलक्यात घेणं महागात पडलंय का?


कोरोनाचं संकट पाहता नागरिकांनी काळजी घेण्याची नितांत गरज असल्याचा आग्रही सूर त्यांनी आळवला. सोबतच कुटुंब प्रमुखांनी या काळात स्वत:सोबतच कुटुंबाचीही काळजी घ्यावी असं म्हणत त्यांनी मास्क वापराच्या सवयीवर भर दिला. नागरिकांचा बेजबाबरदारपणा आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या कायम राहिल्यास मात्र लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याबाबतचा निर्णय प्रशासन घेऊ शकतं याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.



महाराष्ट्रातील कोरोनाची सद्यस्थिती काय?


आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात कोरोना संक्रमणाची एकूण संख्या 20,64,278 वर गेली आहे. तर, मृतांचा आकडा 51,529 वर पोहोचला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 19,75,603 झाली आहे. राज्यात 35,965 रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.