India China Border Conflict : भारत चीन सीमावादाच्या (India China Border) प्रकरणात काँग्रेसने (Congress) मोदी सरकारवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या घटनेला तीन वर्षे काल पूर्ण झाली. त्यानिमित्ताने काँग्रेसने मोदी सरकारवर एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली. मोदी सरकारने याबाबत श्वेतपत्रिका (White Paper) काढावी, संसदेत सविस्तर चर्चा घडवावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
भारतीय लष्कराने सीमेवर 65 पैकी 26 टेहाळणी नाक्यांचा ताबा गमावला हे खरं आहे का असाही सवाल तिवारी यांनी उपस्थित केला. याबाबत लेह लडाखच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्राचा हवाला देत मनीष तिवारी यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.
सीमेवरील परिस्थिती शांत मात्र राजकीय वातावरण तापलेलं
19 जून 2020 मध्ये गलवान सीमेवर भारत आणि चीन दरम्यान चकमक घडलेली होती. त्यानंतर बराच काळ हा तणाव कायम होता. सीमेवरची स्थिती काहीशी शांत असली तरी त्यावरुन राजकारण मात्र शांत होताना दिसत नाही. गेल्या तीन वर्षात याबाबत 18 वेळा चीन-भारत सीमेवर लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे, पण त्यानंतरही सरकार अधिकृत माहिती संसदेला का देत नाही असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. पंतप्रधानांनी 19 जानेवारी 2020 ला केलेल्या वक्तव्यातून एक प्रकारे चीनला क्लीन चिटच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेसकडून मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती
भारत चीनमध्ये तणाव झाल्यानंतर सलग काही महिने हा तणाव कायम राहिला. कधी लडाख सीमेवर तर कधी अरुणाचल सीमेवर चीनने कुरापती काढल्या. भारतीय हद्दीतली दोन हजार चौरस किमी जमीन चीनने बळकावली हे खरं आहे का..आपण ती परत मिळवू शकलो आहे का याबाबत सरकारने माहिती द्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
पावसाळी अधिवेशनातही भारत-चीन सीमावादाचा मुद्दा गाजणार?
संसदेच्या बजेट अधिवेशनातही विरोधकांनी सातत्याने भारत-चीन सीमेबाबत सविस्तर चर्चेची मागणी केली होती. पण सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद आला नव्हता. गोंधळातच कामकाज वाहून गेलं होतं. आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा तापणार का हे पाहावं लागेल.
हेही वाचा
India China Border : उत्तराखंड सीमेजवळ चीनची नवीन खेळी, LAC पासून 11 किमी अंतरावर गाव वसवलं