India China Border : प्रत्यक्ष नियंत्रणे रेषेवर अर्थात एलएसीवर (LAC) भारताला घेरण्यासाठी चीनकडून (China) सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. अशातच लडाख आणि अरुणाचल प्रदेशनंतर आता उत्तराखंडमध्येही (Uttarakhand) चीन बांधकाम करत असल्याचं समोर येत आहे. इंडिया टूडेच्या वृत्तानुसार, उत्तरखंडच्या सीमेजवळ चीन गावं बांधत असल्याचं सांगण्यात येत आहे. चीनची ही गावं सीमेच्या अगदी जवळ म्हणजेच भारतीय सीमेपासून केवळ 11 किमी अंतरावर असल्याचं समजतं. भविष्यातही अशी गावं बांधण्याचा चीनचा विचार आहे. चीनया गावांच्या माध्यमातून चीन उत्तराखंडच्या बाजूनेही भारताला घेराव घालण्याचा प्रयत्न करत आहे. 


पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या देखरेखीखाली उत्तराखंडला लागून असलेल्या LAC पासून 35 किमी अंतरावर सुमारे 55 ते 56 घरे बांधण्यात चीनचा सहभाग आहे. सीमेला लागून असलेल्या पूर्वेकडील सेक्टरमध्ये 400 गावे वसवण्याची त्यांची एकट्याची योजना आहे.


सीमेवर गाव वसवण्याचा चीनचा विचार


इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, चीनने उत्तराखंडच्या सीमेपासून 35 किमी अंतरावर सुमारे 55 ते 56 घरे बांधली आहेत. ही सर्व गावे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) देखरेखीखाली आहेत. याशिवाय सीमेपासून सुमारे 11 किमी अंतरावर गावं वसवण्यास सुरुवात झाली आहे. या वृत्तानुसार सीमेला लागून असलेल्या पूर्व सेक्टरमध्ये 400 गावं वसवण्याचा विचार चीन करत आहे. याद्वारे चीन सीमेवर आपला शिरकाव वाढवत आहे.


स्थलांतरामुळे गावे रिकामी  


उत्तराखंडची चीनसोबत जवळपास 350 किलोमीटरची सीमा आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांत स्थलांतर झपाट्याने वाढत आहे, रोजगार आणि मूलभूत सुविधांअभावी सीमावर्ती गावे सतत रिकामी होत आहेत. ज्याचे नुकसान भारताला सहन करावं लागेल. याउलट चीन आपल्या लोकांना सीमेजवळ वसवण्याचं काम सातत्याने करत आहे. चीनमधील ही गावे सर्व सुविधांनी सुसज्ज आहेत. तर चीनच्या सीमेला लागून असलेल्या गावांमधील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.


6 किमी लांबीचा बोगदा बनवण्याची तयारी


सीमेवर 6 किमी लांबीचा बोगदा बांधण्याची तयारी भारत करत असल्याचं वृत्त पीटीआयने बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (BRO) एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलं आहे. लिपुलेख खिंडीच्या शेवटच्या सीमा चौकीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुलभ करण्यासाठी, हा सहा किलोमीटर लांबीचा बोगदा उत्तराखंडमधील घाटियाबागर-लिपुलेख रस्त्यावर बुंदी आणि गरबियांग दरम्यान बांधला जाईल. सध्या याबाबत सर्वेक्षण सुरु आहे. सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प येत्या चार-पाच वर्षांत सुरु होऊ शकतो.


बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) च्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये पूर्ण झालेला सीमा रस्ता सध्या ब्लॅक टॉप आणि डबल लेनचा बनवला जात आहे. दुहेरी मार्गाचे बहुतांश काम जवळपास पूर्ण झाले आहे. म्हणजेच भारतही चीनचा सामना करण्यासाठी प्रत्येक आघाडीवर तयारीत व्यस्त आहे.