Parliament Special Session: केंद्र सरकारनं (Modi Government) संसदेचं विशेष अधिवेशन (Parliament Special Session) बोलावलं आहे. 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. यामध्ये 10 हून अधिक महत्त्वाची विधेयकं मांडली जातील. मात्र ही विधेयकं नेमकी कुठली आहेत? ते काही वेळातच कळणार आहे. दरम्यान, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय राजधानीत G20 शिखर परिषदेच्या काही दिवसांनंतर हे विशेष अधिवेशन होईल. पण या अधिवेशनात काय अजेंडा असेल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. 


संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांनी गुरुवारी (31 ऑगस्ट) एक्सवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, संसदेचं विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये 5 बैठका होणार आहेत.


"संसदेचे विशेष अधिवेशन 17व्या लोकसभेचे 13वे अधिवेशन आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत बोलावण्यात आलं आहे. ज्यामध्ये पाच बैठका होणार आहेत. अमृत ​​कालच्या दरम्यान संसदेत फलदायी चर्चा आणि वादविवाद होण्याची अपेक्षा आहे." असं प्रल्हाद जोशी म्हणाले आहेत. 


10 हून अधिक विधेयकं मांडली जाणार, सूत्रांची माहिती 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात 10 हून अधिक महत्त्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत. विधेयकांमुळे विशेष अधिवेशन बोलावण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. 


संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Parliament) 20 जुलै ते 11 ऑगस्टपर्यंत चाललं होतं. यादरम्यान मणिपूरमधील हिंसाचारावर (Violence in Manipur) दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भात उत्तर द्यावं यासाठी विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. 






विरोधकांनी आणलेला मोदी सरकारवर अविश्वास ठराव 


मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी आघाडी इंडियानंही केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. अखेर मोदींनी सभागृहात मणिपूर हिंसाचारावर उत्तर दिलं, तसेच त्यांनी काँग्रेसवर आणि विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियावरही हल्ला चढवला होता. 


राहुल गांधींचाही सहभाग 


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधींची खासदारकी त्यांना परत मिळाली. त्यानंतर राहुल गांधींना संसदेचं सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आलं. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही पावसाळी अधिवेशनात सहभाग घेतला. आपल्या भाषणात त्यांनी मणिपूर हिंसाचारावरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी सभागृहात उत्तर दिले. हा अविश्वास ठराव आवाजी मतदानाने पराभूत झाला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


LPG Prices: 9 वर्षात एलपीजीचे दर 185 टक्क्यांनी वाढवले अन् 17.5 टक्क्यांनी घटवले; काँग्रेसचा आरोप