मुंबई : 'इस शहर को ये हुआ क्या, कहीं राख है तो कहीं धुंवा-धुंवा...' कोणत्याही सिनेमाच्या सुरुवातीला थिएटरमध्ये लागणारी ही धुम्रपानाची जाहिरात. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळे ही वाक्यं आता हवा प्रदूषणासाठी वापरावीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या 2012 च्या आकडेवारीनुसार भारतात वायू प्रदुषणामुळे वर्षभरात 6 लाख 21 हजार 138 लोकांचा मृत्यू होतो. भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 75 टक्के मृत्यू वायू प्रदुषणाशी संबंधित असतात. बहुतांश लोकांना श्वसनाचे विकार, हृदयरोग, तसेच फुफ्फुसाशी संबंधित आजार झाले आहेत.
2012 च्या आकडेवारीनुसार भारतात हृदयरोगामुळे 2 लाख 49 हजार 388 जणांचे मृत्यू होतात. जगभरात प्रत्येक 10 पैकी 9 जण घातक हवेचं श्वसन करत आहेत. वायू प्रदुषणामुळे होणारे 90 टक्के मृत्यू हे मध्य आणि अल्प उत्पन्न गटातील देशांमध्ये आहेत. अर्थात प्रत्येक गोष्टीला असतात तसे या समस्येपासून सोडवणूक करण्यासाठी देखील उपाय आहेत.
तंत्रज्ञान विकसित होत आहे, नवनवे शोध लागत आहेत. त्याद्वारे मानवी जीवनही सुलभ होत आहे. मात्र असं असलं तरी माणसाचं सरासरी आयुष्यमान कमी होत चाललं आहे. विकासाच्या आडून येत असलेला प्रदूषणरुपी राक्षस त्यास जबाबदार आहे. त्याला वेळीच गाडलं नाही, तर मानवाचा विनाश अटळ आहे.