Independence Day 2023 : आज देशभर स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी देशभरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. देशातील सर्व नागरिकांच्या एकजुटीतून  स्वातंत्र्य आणि लोकशाही भक्कम करुया. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता मजबूत करण्याचा स्वातंत्र्यदिनी दृढनिर्धार करुया असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 


देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्वाचा त्याग केलेल्या, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले. तसेच उत्कृष्ट कामगिरी, उल्लेखनीय सेवेबद्दल स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला  राष्ट्रपती पदक, सेवापदक जाहीर झालेल्या राज्यातील पोलिस, अग्निशमन, नागरी संरक्षण दल, गृहरक्षक दलाच्या अधिकारी आणि जवानांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.


देशाचा गौरव वाढवण्यात सर्व क्षेत्रातील नागरिकांचं योगदान 


देशाला मिळालेले स्वातंत्र्य आपल्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी केलेल्या त्याग, बलिदानातून मिळाले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम राखण्यासाठी गेल्या 76 वर्षात भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी बलिदान दिले. या सर्वांच्या त्यागाचं स्मरण करुन देशातील लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी कटीबद्ध होण्याचा आज दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्योत्तर 76 वर्षांच्या वाटचालीत, देशाचा गौरव वाढवण्यात शेतकरी, कष्टकरी, डॉक्टर, वकिल, इंजिनियर, पत्रकार, व्यापारी, उद्योजक, संशोधक, खेळाडू, कलावंत मंडळी, विद्यार्थी, शिक्षक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते अशा सर्वांचं योगदान आहे. या समस्त देशवासियांची एकजूट, कष्टामुळं, मेहनतीमुळं देश आज अभिमानाने उभा आहे. प्रगती करत आहे. ही एकजूट अशीच कायम ठेवून, सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांनी एकत्र येऊन देशाला जागतिक शक्ती बनवण्याचा दृढनिर्धार करुया. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाची लोकशाही मजबूत करुया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला करणार संबोधीत


77 व्या स्वातंत्र्य दिन (Independence Day 2023) सोहळ्यासाठी देश सज्ज झाला आहे. ऐतिहासिक लाल किल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  हे सोहळ्याचा प्रारंभ करणार आहेत. राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर प्रथेप्रमाणे पंतप्रधान ऐतिहासिक लाल किल्याच्या तटावरुन राष्ट्राला संबोधित करतील. या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनी 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या कार्यक्रमाचा समारोप  होणार आहे. दरम्यान, या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी समाजातल्या विविध स्तरातल्या सुमारे 1 हजार 800 लोकांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण करण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Independence Day 2023 : देशाचा आज 77वा स्वातंत्र्यदिन, पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरुन सलग दहाव्यांदा संबोधित करणार