चेन्नई/हैदराबाद : स्वतःला कल्कि या देवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या विजय कुमार नायडू आणि त्याच्या मुलाच्या आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकातील आश्रमांवर आयकर विभागानं छापेमारी केली आहे. त्यात 600 कोटी रुपयांची अघोषित संपत्ती उघड झाली आहे. दरम्यान या कल्की बाबाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, मी देश सोडून कुठेही गेलेलो नाही.


आयकर विभागाने विजय कुमार नायडूशी संबधित एकूण 39 ठिकाणी छापे टाकले. त्यापैकी आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील कल्कि आश्रमावरील झाडाझडतीत 65 कोटींची अघोषित संपत्ती सापडली आहे. त्यात 45 कोटींची रोकड आणि 20 कोटी रुपये इतके मूल्य असलेले अमेरीकन डॉलर तसेच इतर देशांमधील चलनाचा समावेश आहे.

16 ऑक्टोबरपासून आयकर विभागाच्या या धाडी सुरु आहेत. दरम्यान, विजयकुमार नायडू, त्याचा मुलगा एन के व्ही कृष्णा आणि कुटुंबातील अन्य सदस्यांना आयकर विभागाने समन्स बजावले आहे, तसेच चौकशीसाठीदेखील बोलावले आहे.

दरम्यान, या छापेमारीनंतर नायडूने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की, मी देश सोडून कुठेही गेलेलो नाही, मी देशातच आहे. तसेच मी माझ्या भक्तांना सांगू इच्छितो की माझी तब्येतही ठीक आहे.

आयकर विभागाच्या धाडींनंतर नायडू देश सोडून पळून गेला असल्याची बातमी काही माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. त्यास उत्तर देण्यासाठी नायडूने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.