नवी दिल्ली : बिटकॉईनसह क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता आयकर विभागाने नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 17 महिन्यात 3.5 अब्ज डॉलर्सचे व्यवहार क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून झाले आहेत. यानंतर आयकर विभागाने कडक पावलं उचलत यातील गुंतवणुकदारांना नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला.


आयकर विभागाने पुणे, बंगळुरु, मुंबई, दिल्लीसह नऊ एक्सचेंजमधून माहिती संकलित केल्यानंतर त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बिटकॉईन आणि इतर व्हर्च्युअल करन्सीजमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये टेक सेव्ही युवा इनव्हेस्टर्स, रियल इस्टेट प्लेयर्स, सराफींचा समावेश आहे.

सध्या क्रिप्टोकरन्सीचा व्यवसाय करणाऱ्यांवर लगाम घलण्यासाठी विविध देशातील सरकारे प्रयत्नशील आहेत. सरकारच्या मते, याद्वारे काळापैशांची विल्हेवाट लावणे, तसेच करचुकवेगिरी करण्याच्या पर्यायांचा वापर केला जात आहे. त्यामुळे, येत्या मार्च महिन्यात अर्जेंटिनामध्ये होणाऱ्या जी-20 समिटमध्येही या विषयावर चर्चा होणार आहे.

दरम्यान, क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारकडून यापूर्वीच सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये गुंतवणूक करणं, म्हणजे पोंझी स्कीम्स सारखं असल्याचं सांगत, यात नुकसान झाल्यास त्याला सरकार जबाबदार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.

आर्थिक विषयातील जाणकारांच्या माहितीनुसार, दर महिन्याला तब्बल दोन लाख लोक क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करत आहेत. कर्नाटकच्या आयकर विभागाचे महासंचालक बी.आर.बालकृष्णन यांनी याबद्दल सांगितलंय की, “व्हर्च्युअल करन्सी ट्रेडशी जोडल्या जाणाऱ्या लोकांचा वर्ग आणि त्यांची संख्या यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.”

गूढचलन : तयार कसं होतंमिळवायचं कसं?

प्रत्येक देशाचं सरकार आपापल्या देशाच्या चलनी नोटा छापतं. ते ते चलन त्या त्या देशात लीगल टेंडर असतं आणि साधे कागदी तुकडे असूनही ते देशातल्या सर्व व्यवहारांसाठी वापरले जातात.

बिटकॉइन्स हे मात्र कोणी एक सरकार, कंपनी, संस्था किंवा व्यक्ती तयार करत नाही. ते चलन कोणाच्याच मालकीचं नाही. कोणा एकाचं त्यावर नियंत्रण नाही. ते चलन वापरणाऱ्या सर्व 'नेटवर्क'च्या मालकीचं आहे.

बिटकॉइन हे मुक्तस्रोत (ओपन सोर्स) सॉफ्टवेअरमधून तयार होणारं आणि वापरता येऊ शकणारं चलन आहे. बिटकॉइन संबंधित सॉफ्टवेअर्स वापरून 'नेटवर्क'साठी ठरावीक काम करणाऱ्या लोकांना नवी बिटकॉइन्स मिळतात.

ह्या कामाचं मुख्य स्वरूप काही अत्यंत क्लिष्ट गणिताचे प्रश्न सोडवणं असं असतं. (गणितं वगैरे सोडवून करन्सी मिळेल असं लहानपणी कोणी सांगितलं असतं, तर निदान पाढे तरी पाठ केले असते! पण ते असो). अर्थात ती अत्यंत क्लिष्ट गणितं सोडवायचा प्रयत्न करणारीही सॉफ्टवेअर्स असतात आणि ती आपल्याला आपल्या कॉम्प्युटरवर चालवत ठेवायची असतात. ह्याला बिटकॉइनचं खाणकाम उर्फ 'मायनिंग' म्हणतात. हे मायनिंग करत करत काही ठरावीक गणिती कोडं सोडवलं की ते सोडवणाऱ्याला ठरावीक बिटकॉइन्स मिळतात.

ही गणिती कोडी सहज गंमत म्हणून घातलेली कोडी नसून ती कोडी सोडवल्याने बिटकॉइनचे व्यवहार अधिकाधित सुरक्षित होत असतात. आणि गंमत म्हणजे आधीची कोडी सुटली की येणारी नवी कोडी जास्त जास्त क्लिष्ट बनत जातात.

पण अशी अनंत कोडी सोडवत राहून अमर्याद बिटकॉइन्स तयार होणार नाहीत, कारण जगात एकूण किती बिटकॉइन्स तयार होणार यावर मर्यादा आहे, तसंच दर महिन्या-वर्षाला किती नवी बिटकॉइन्स तयार होणार यावरही मर्यादा आहे. त्याची सुरुवात ज्यांनी केली, त्या डेव्हलपर्सनी दोन्ही मर्यादा आखून देऊन सॉफ्टवेअरमध्येच अंतर्भूत केल्या आहेत. जगातल्या सर्व डेव्हलपर्सनी आणि सर्व नेटवर्कनी मान्य केल्याशिवाय ह्यात बदल होणार नाही.

तर अशा पध्दतीने तयार झालेल्या बिटकॉइन्सचं लोक करतात काय?

एखाद्याकडे मायनिंग करून बिटकॉइन्स जमली की ती तो ऑॅनलाईन गोष्टी विकत घेण्यासाठी वापरू शकतो किंवा जगातल्या दुसऱ्या कोणालाही पैसे म्हणून बिटकॉइन्स पाठवू शकतो.

तसंच अनेक बिटकॉइन एक्स्चेंजेसही सुरू झाली आहेत. जवळचे बिटकॉइन्स विकून साधा सरकारी पैसा घ्यायचा असेल किंवा सरकारी पैसा देऊन बिटकॉइन्स विकत घ्यायची असतील, तर ते ह्या एक्स्चेंजेसवर जाऊन करता येतं.

(‘गूढचलन : तयार कसं होतंमिळवायचं कसं?’ हा उतारा स्तंभलेखक प्रसाद शिरगावकर यांच्या साप्ताहिक विवेकमधील लेखातून साभार)

संबंधित बातम्या

बिटकॉईनमधली गुंतवणूक पोंझी स्कीमसारखी : अर्थ मंत्रालय

एक कोटी गुंतवले, 114 कोटी मिळवले, बिग बी मालामाल

बिटकॉईनपासून दूर राहा, आरबीआयचा सल्ला

बिटकॉईन इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली नागपूरकरांची घोर फसवणूक