सोमवारच्या सुनावणी यादीनुसार, हा खटला कोर्ट 1 मध्ये 45 क्रमांकावर आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रांसोबत न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर या खटल्याची सुनावणी होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सुप्रीम कोर्टाच्या प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावेळी या चारही न्यायमूर्तींनी अशीही तक्रार केली होती की, कनिष्ठ न्यायमूर्तींना महत्त्वाच्या केस दिल्या जातात. या वादामध्ये न्यायाधीश लोया यांच्या खटल्याची देखील चर्चा झाली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नागपुरात 1 डिसेंबर 2014 रोजी जज ब्रिजमोहन हरिकिशन लोया यांचा मृत्यू झाला होता. सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नाला जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालं होतं. मात्र लोया यांच्या बहिणीने त्यांच्या मृत्यू प्रकरणी प्रश्न उपस्थित केले होते. सोहराबुद्दीन केसशी लोया यांचा असलेला संबंध आणि त्यांचा अचानक मृत्यू यावरुन संशय उपस्थित केले गेला.
सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण
गुजरातमध्ये सोहराबुद्दीन शेख, त्यांची पत्नी कौसर बी आणि त्यांचे सहकारी तुलसीदास प्रजापती यांचा नोव्हेंबर 2005 मध्ये कथित बनावट चकमकीत मृत्यू झाला होता. पोलिस कर्मचाऱ्यांसह 23 आरोपींवर या प्रकरणी केस दाखल आहे. हे प्रकरण आधी सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं, त्यानंतर ते मुंबईला ट्रान्सफर करण्यात आलं.
जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच : नागपूर पोलीस
न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यू हृदय विकारामुळे झाल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती नागपूरचे पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली होती.
लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास नागपूर पोलिसांकडे होता. त्यामध्ये हा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं निष्पन्न झाले असून त्या संदर्भात नागपूर पोलिसांचा तपास पूर्ण झाला आहे.
लोया यांच्या मृत्यू प्रकरण तपासावर नागपूर पोलीस काय म्हणाले?
- लोया यांच्या मृत्यूची माहिती पोलिसांना त्यांचे डॉ. प्रशांत राठी यांनी दिली.
- 1 डिसेंबर 2014 रोजी पहाटे 4 वाजता न्या. लोया यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. तिथे ईसीजी केलं, त्यात त्यांना हृदयविकार असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना मेडिट्रीना रुग्णालयात नेण्यात आलं.
- तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
- त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं.
- शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात कोरोनरीच्या अभावामुळे मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
- त्यानंतर लोया यांचा मृतदेह रुग्णवाहिकेने लातूरला पाठवण्यात आला.
- या प्रकरणाच्या चौकशीत पोलिसांनी दंदे रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल, तिथल्या डॉक्टरांचं मत घेतलं, मेडिट्रीना रुग्णालयाचे केस पेपर तपासले.
- शवविच्छेदनाच्या सविस्तर अहवालातही लोया यांचा मृत्यू कोरोनरीच्या अभावामुळे झाल्याचं निष्पन्न झालं.
- व्हिसेरा रिपोर्टमध्येही लोया यांच्या शरीरात विष वगैरे आढळलं नाही.
- अंतिम शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा रिपोर्टच्या आधारे डॉक्टरांनी लोया यांचा मृत्यू हृदय विकाराने झाल्याचा अंतिम निष्कर्ष दिला.
संबंधित बातम्या :
सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?
सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता
सोहराबुद्दीन प्रकरणातील जजच्या मृत्यू प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी
सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील
PHOTO : न्यायमूर्तींच्या पत्रकार परिषदेतील 6 महत्त्वाचे मुद्दे