नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात आज डझनभर युवा संघटना युवा काँग्रेसच्या नेतृत्वात आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला देश बचाओ, युवा बचाओ असं नाव देण्यात आलं आहे. या आंदोलनात मोदी सरकारविरोधात विविध मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत.


बेरोजगारी, एसएससी परीक्षांमधील घोटाळा, इंधन दरवाढ, महागाई, राफेल करार या मुद्द्यावर या संघटना आवाज उठवणार आहे. मोठ्या संख्येने या संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमणार आहेत. मंडी हाऊस ते जंतर मंतरपर्यंत पायी मोर्चा काढणार आहेत.


काँग्रेस, राष्ट्रवादी, सीपीआय, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, जेडीएस, नॅशनल कॉन्फरन्सच्या युवा संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त युवा फ्रंट निर्माण करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. आज या संयुक्त युवा फ्रंटचे नेते आणि कार्यकर्ते पहिल्यांदा रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवणार आहेत.


या संघटना सहभागी होणार


1. भारतीय युवा काँग्रेस
2. ऑल इंडिया युथ फ्रन्ट (सीपीआय)
3. राष्ट्रवादी युवा काँग्रेस (राष्ट्रवादी काँग्रेस)
4. समाजवादी युवाजन सभा (समाजवादी पक्ष)
5. ऑल इंडिया युथ लीग (फॉरवर्ड ब्लॉक)
6. युथ लीग (आययूएमएल)
7. लोकतांत्रिक युवा जनता दल
8. युवा राष्ट्रीय लोक दल
9. राष्ट्रीय जनता दल
10. जनता दल (सेक्युलर)
11. नॅशनल कॉन्फरन्स (युवा)
12. केरळ काँग्रेस (एम)
13. केरळ काँग्रेस (जे)
14. रिव्होल्युशनरी युथ फ्रन्ट (आरएसपी यूथ विंग)
15. डीएमके