मुंबई : सरकारी काम आणि सहा महिने थांब...असं आपल्याकडे विनोदाने म्हणतात...काँग्रेसच्याही बाबतीत समविचारी पक्ष आता तसेच बोलू लागले असावेत... काँग्रेसचं काम आणि वाट पाहात थांब....एमआयएमशी आघाडी करुन चर्चेत आलेल्या प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसने आता 12 जागा दिल्या तरच विचार करु अशी ताठर भूमिका घेतलीय. त्याआधी समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी यांनीही काँग्रेस नेत्यांच्या दिरंगाईला कंटाळून वेगळी वाट स्वीकारली आहे.


औरंगाबादमधल्या सभेत भीम आणि मीम एकजुटीचा फॉर्म्युला देशाने बघितला. तसं झालं तर काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडण्याचं भाकितही करण्यात आलं. इतकंच काय... वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असल्याची टीकाही करण्यात आली. पण त्यानंतरही काँग्रेसला या आघाडीला गांभीर्याने घ्यावं असं वाटत नाही.

सपा आणि बसपानेही हाताची साथ आधीच सोडलीय. बोलणी झालीच नाही आणि मायावतींच्या हत्तीने हाताची साथ सोडत स्वतंत्र मार्ग स्वीकारला. अखिलेश यादव यांनीही मायावतींचा मार्ग योग्य असल्याचं सांगत सायकल वळवली.

काँग्रेसला दिरंगाईचा फटका बसण्यास सुरुवात झाली सुरुवात झाली गोव्यापासून.. निकालानंतर काँग्रेसचा सत्तेवर हक्क असूनही पक्षाचे नेते हॉटेलच्या सूटमध्ये झोपी गेले आणि दिल्लीतून आलेल्या भाजपच्या नेत्यांनी रात्र जागवून सकाळी सत्तेचा सूर्य स्वत:च्या क्षितिजावर उगवला. त्यानंतरही दिरंगाई काही संपली नाही.

आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातही फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्तेतील प्रबळ पक्षाशी टक्कर देताना दिरंगाईपेक्षा चपळाईवरच भर द्यावा देणं ही काँग्रेससाठी काळाची गरज आहे. अन्यथा काँग्रेसमुक्त भारताचं भाजपाचं स्वप्न स्वतः काँग्रेसच साकारेल.