मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केंद्र आणि राज्य सरकारने कपात केल्यानंतर सलग तिसऱ्या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल 21 पैशांनी तर डिझेल 31 पैशांनी महागलं आहे. या दरवाढीनंतर आज मुंबईत पेट्रोल 87.50 तर डिझेल 77.37 रुपयांनी विकलं जात आहे.
शनिवारपासून आजपर्यंत तीन दिवसात पेट्रोल 53 पैशांनी तर डिझेल 87 पैशांनी महागलं आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलची किंमत झपाट्यानं वाढत आहे.
इंधनदरवाढीपासून दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी अडीच रुपयांची कपात केली होती. तर राज्य सरकारनेही पेट्रोलच्या दरात अडीच रुपये आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 56 पैशांची कपात केली होती. म्हणजेत पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 4 रुपये 6 पैशांनी स्वस्त झालं होतं.
मात्र पुन्हा सुरू झालेल्या दरवाढीनं ही पाच आणि 4 रुपये 6 पैशांची कपात फार काळ टिकेल असं दिसत नाही. सरकारने केलेल्या कपातीनंतर पेट्रोल नव्वदीच्या खाली आले होते. मात्र सततच्या दरवाढीमुळे पेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. त्यामुळे हा इंधन कपातीचा दिलासा तात्पुरता होता का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम म्हणून इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. इंधनदरवाढीमुळे इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवरही परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारवर टीका करण्याची आयती संधी विरोधकांना मिळत आहे.