मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर (Narendra Modi Lakshadweep Visit) अवमानजनक टिप्पणी करणं मालदिवच्या मंत्र्यांना चांगलंच महागात पडल्याचं दिसून आलं.  मरियम शिउना, मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूम मजीद या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मालदीवच्या काही मंत्री आणि नेत्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर हा वाद आणखी वाढला. पंतप्रधान मोदी 2-3 जानेवारी रोजी लक्षद्वीपमध्ये अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी होते. पीएम मोदींनी त्यांच्या लक्षद्वीप भेटीदरम्यान घेतलेल्या अनुभवाचे काही फोटो आणि व्हिडrओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केले होते. त्यांनी भारतीय पर्यटकांना त्यांच्या पर्यटकांच्या यादीत लक्षद्वीपचा समावेश करण्याचे आवाहनही केले होते.


यावर मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी पीएम मोदींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आणि भारत सरकार लक्षद्वीपला मालदीवचे पर्यायी पर्यटन स्थळ म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केला.


सोशल मीडियावर संताप व्यक्त


मालदीवच्या युवा मंत्रालयात, उपमंत्री मरियम शिउना, मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूम मजीद यांनी पीएम मोदींबद्दल अशोभनीय टिप्पणी केली. त्यामुळे अनेक मोठ्या व्यक्तींसह भारतीयांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले.


भारतातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लोकांना मालदीवला जाण्याऐवजी देशांतर्गत पर्यटन स्थळांना भेट देण्याचे आवाहन केले. अनेक भारतीय मालदीवचा दौरा रद्द करत असल्याचा दावाही सोशल मीडियावर करण्यात आला होता.


रविवारी (७ जानेवारी) माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी मालदीव सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला आणि तीव्र आक्षेप नोंदवला. यानंतर मालदीवच्या तीन उपमंत्र्यांच्या निलंबनाची बातमी आली. स्थानिक मीडिया अॅटोल टाईम्सच्या वृत्तानुसार, मालदीव सरकारने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद टिप्पणी करणाऱ्या मरियम शिउना, मलशा शरीफ आणि महजूम मजीद या तीन उपमंत्र्यांना त्यांच्या पदावरून निलंबित केले.


त्याच वेळी, मालदीवचे आणखी एक उपमंत्री हसन जिहान यांनी स्थानिक मीडियाच्या पोस्टचा हवाला देत, त्यांना इतर मंत्र्यांसह मंत्रिमंडळातून निलंबित केल्याच्या वृत्ताचे खंडन केले.


मरियम शियुन यांनी पंतप्रधान मोदींसाठी 'क्लोन' आणि 'कठपुतली' असे शब्द वापरले होते आणि नंतर वाद वाढल्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील त्यांची पोस्ट हटवली. मालदीवचे नेते झाहिद रमीझ यांनी आपल्या पोस्टमध्ये विचारले होते की, भारत मालदीवपेक्षा चांगली सेवा देऊ शकतो का?


यापूर्वी एका निवेदनात मालदीव सरकारने असे अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही असे म्हटले होते. मालदीव सरकारने मंत्र्यांच्या वक्तव्याचा आणि आपला संबंध नसून त्यांचे ते वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट केलं.


ही बातमी वाचा: