नवी दिल्ली : देशात नोटाबंदीचा निर्णय होऊन आता चार महिने पूर्ण झाले आहेत. पण या निर्णयाने सर्वसामान्यांवर झालेल्या परिणामांची अजूनही चर्चा सुरु आहे. अनेक आंतरराष्ट्रीय ब्रोकिंग कंपन्या आणि रेटिंग एजन्सींनीही याचा वाईट परिणाम झाल्याचं मान्य केलं आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)ने यापूर्वीच नोटाबंदीने देशाच्या जीडीपीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली होती. पण आता याचसंदर्भात आणखी एक वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे.


आयएमएफच्या एका अधिकाऱ्याने नोटाबंदीने देशात रोख रकमेची मोठी समस्या निर्माण झाली असून, याने सामान्य ग्राहक मोठ्याप्रमाणात प्रभावित झाल्याचं म्हणलं आहे. तसेच या निर्णयाने देशातील रोकड व्हॅक्यूम क्लीनरप्रमाणे शोषली आहे. शिवाय यानंतर रोकड पोहचवण्यचं काम धिम्या गतीने सुरु असून, चलनटंचाईची समस्या मिटवली जात असल्याचं सांगितलं आहे.

आयएमएफचे अशिया विभागाचे सहाय्यक संचालक पॉल ए कॅशीन यांनी सांगितले की,  ''तुम्ही अपारंपरिक पद्धतीने मुद्रा नीतिंचा वापर करुन हेलिकॉप्टरने पैसे पाठवण्याबाबत ऐकले असेल. अशाच प्रकारे नोटाबंदीच्या निर्णयाला व्हॅक्यूम क्लीनरप्रमाणे घेतलं जाऊ शकतं,'' असं म्हणत नोटाबंदीच्या निर्णयाची खिल्ली उडवली.

दरम्यान, आयएमएफने भारतासंदर्भातील आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला असून, कॅशीन यांना याबाबत विचारले असता, त्यांनी हा निर्णय म्हणजे व्हॅक्यूम क्लीनरने रोकड शोषण्यासारखा असल्याचं म्हणलं. तसेच यानंतर व्हॅक्यूम क्लीनर उलटा फिरवून पैसा वाटला जात आहे. पण याची गती अतिशय धिमी आहे. याने देशात चलनटंचाई निर्माण झाली आहे. ज्याने देशातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. असंही सांगितलं.

तर दुसरीकडे बाजरपेठेतील चलन तुटवड्यावरुन आयएमएफने आपल्या अहवालातून केंद्र सरकारला बँकेत नव्या नोटा उपलब्ध करुन देण्याचे काम जलद गतीने करावे, अशा कानपिचक्याही दिल्या आहेत. तसेच दुर्गम भागासाठी जुन्या नोटा वापरण्यासंदर्भातील सूट द्यावी अशाही सुचना दिल्या आहेत.