Weather Update Today : आज वायव्य भारताला ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा सामना करावा लागेल. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता (Unseasonal Rain) असल्याचं आयएमडीने (India Meteorological Department) म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD)  ताज्या अंदाजानुसार, आज पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्लीमध्ये सकाळच्या वेळी दाट ते अत्यंत दाट धुके दिसण्याची शक्यता आहे. त्यासोबत काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, वीकेंडच्या पावसानंतर देशात थंडीचा जोर वाढण्याची (Cold Weather)शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.


वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक भागात पावसाची शक्यता


हवामान विभागाने म्हटलं आहे की, वायव्य भारतात नव्या सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामान काहीसा बदल होण्याची शक्यता आहे. आयएमडीने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार, एका नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा शनिवारपासून वायव्य भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली, अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होईल, असंही आयएमडीने (IMD) म्हटलं आहे. तसेच, हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानमध्ये आज आणि उद्या हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशातही आज आणि उद्या पावसाची हजेरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि केरळच्या काही भागात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळेल.


काश्मीर खोऱ्यात पाऊस आणि बर्फवृष्टी


आयएमडीच्या अंदाजानुसार, 4 आणि 5 फेब्रुवारी दरम्यान, जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रदेशांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पश्चिम राजस्थानमध्ये तसेच उत्तर मध्य प्रदेशात आज आणि उद्या गारपीट होण्याची शक्यता आहे. 


पावसामुळे थंडीत घट


देशात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने थंडीत काहीशी घट झाली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अपडेटनुसार, देशातील अनेक भागात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, ओडिशा, आसाम आणि मेघालयमध्ये 4 आणि 5 फेब्रुवारीला दाट धुके पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशच्या विविध भागात रविवारी थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी सकाळी पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या विविध भागात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. 5 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीसह गारपीट होण्याची शक्यता आहे. 4 फेब्रुवारीला हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.