नवी दिल्ली : "छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तिथेच राजीनामा दिला असता. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांचं वर्तन चुकीचं नाही," अशी प्रतिक्रिया राज्यसभेचे खासदार आणि भाजप नेते उदयनराजे यांनी दिली. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' घोषणेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी ही प्रतिक्रिया दिली. कुठल्याही प्रकारे महाराजांचा अपमान झाला ही. याच्याएवढी हास्यास्पद गोष्ट असू शकत नाही, असंही उदयनराजे म्हणाले.
"माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं फक्त नायडू म्हणाले. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला. राज्यघटनुसार अशा घोषणा देता येणार असं त्यांनी सांगितलं. यानंतर व्यंकय्या नायडूंनी घोषणा राज्यघटनेला धरुन नसल्याचं सांगितलं. आदरणीय शरद पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा. जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे," असे उदयनराजे म्हणाले.
सभापतींची उदयराजेंना समज राज्यसभा खासदारांनी काल (22 जुलै) शपथ घेतली. यावेळी भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी 'जय हिंद,जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली. "तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या' असं व्यंकय्या नायडू म्हणाले.
भाजपचं तोंडबंद आंदोलन : संजय राऊतांचं ट्वीट
जय भवानी जय शिवाजी या घोषणेवरुन झालेल्या वादावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजपचं तोंडबंद आंदोलन सुरु झाल्याचं संजय राऊत म्हणाले होते. ""छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही...जय भवानी! जय शिवाजी!," असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.