राहुल गांधी म्हणाले की, मोठ्या स्तरावर विचार करूनच भारताचं रक्षण केलं जाऊ शकतं. चीनबरोबर सीमा वाद आहे आणि आपण तो सोडविला पाहिजे, पण आपला मार्ग बदलला पाहिजे. आपली विचारसरणी बदलली पाहिजे. आम्ही दोन डगरीवर उभे आहोत. जर आपण एका बाजूला गेलो तर आपल्याला यश मिळेल आणि दुसरीकडे गेलो तर विसंगत होऊन जाऊ, असं ते म्हणाले.
चीनच्या मुद्द्याबाबत काय म्हणाले राहुल गांधी
चीनशी दोनहात करण्याबाबत राहुल गांधी म्हणाले की, जर आपण त्यांच्यासोबत लढण्यासाठी मजबूत स्थितीत असलो तरच आपण काम करु शकू. आपल्याला जे काही मिळवायचं ते मिळवू शकू. मात्र त्यांनी आपली कमजोरी पकडली तर गडबड होऊ शकते, असं राहुल गांधी म्हणाले. चीनशी सामोरे जाण्यासाठी आपण मजबूत स्थितीत असायला हवं. आपण चीनशी कोणत्याही दृष्टीकोनाशिवाय करार करू शकत नाही. मी केवळ राष्ट्रीय दृष्टिकोनाबद्दल बोलत नाही तर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून बोलत आहे. बेल्ट अँड रोड हा पृथ्वीचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न आहे. भारताने जागतिक दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे. भारताला आता एक विचार बनावा लागेल, एक जागतिक विचार असावा, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधींचा सिरीजमधला तिसरा व्हिडीओ
राहुल गांधी यांनी 'ट्रुथ विथ राहुल गांधी' या मालिकेतला तिसरा व्हिडीओ शेअर केला. याआधी त्यांनी पहिला व्हिडीओ 17 जुलै रोजी शेअर केला होता. त्यात चीनकडून सीमेवर होत असलेलं आक्रमण, घुसखोरी यावर भाष्य केलं होतं. तर दुसरा व्हिडीओ हा 20 जुलै रोजी शेअर केला होता. यामध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या काही धोरणांवर सवाल उपस्थित केले होते. पंतप्रधान मोदी हे डुप्लिकेट स्ट्राँगमॅनची प्रतिमा तयार करत आहेत, असं म्हटलं होतं.