नवी दिल्ली : साखरेचे दर बाजारात प्रचंड घसरलेले असताना आयात-निर्यातीबद्दलचे योग्य निर्णय वेळीच घेतले नाहीत तर हा उद्योग संकटात येईल. जर हे निर्णय वेळेत झाले नाहीत तर भविष्यात बँकांप्रमाणे साखर उद्योगासाठीही बेलआऊट पॅकेज देण्याची वेळ येईल. शुगर फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी अशी भीती व्यक्त केली आहे. शुगर फेडरेशनच्या शिष्टमंडळानं आज (गुरुवार) केंद्रीय अधिकाऱ्यांची भेट घेतली.


'सध्या साखर 3600 रुपये क्विंटलवरुन 2900 रुपये क्विंटलपर्यंत घसरली आहे. सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2500 रुपये एफआरपी जाहीर केला आहे. पण सध्याच्या भावानुसार साखरेवरचा उत्पादन खर्च पकडला तर तो 3500 रुपयापर्यंत पोहचतो. त्यामुळे काही दिवसांनी शेतकऱ्याला एफआरपीप्रमाणे किंमत देणंही साखर उद्योगाला परवडणारं नाही, त्यातून शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा.' अशी मागणी शुगर फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचं उत्पादन 30 टक्क्यांनी वाढलं आहे. एकट्या महाराष्ट्रात मागच्या वर्षी 301 लाख टन उसाचं गाळप झालेलं होतं, तर त्या तुलनेत यंदा 500 लाख टन गाळप झालेलं आहे. साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं सध्याचं आयात शुल्क 40 वरुन 100 पर्यंत वाढवावं, तसंच जास्तीत जास्त निर्यातीला प्रोत्साहन देऊन देशातली साखर बाहेर पाठवावी अशी मागणी शिष्टमंडळानं केली आहे.

'जर हे निर्णय वेळेत झाले नाहीत तर भविष्यात बँकांप्रमाणे साखर उद्योगासाठीही बेलआऊट पॅकेज देण्याची वेळ येईल.' असा गंभीर इशाराही वळसे-पाटील यांनी दिला आहे.

VIDEO : दिलीप वळसे पाटील आणि रोहित पवार यांच्याशी खास बातचीत