श्रीहरीकोटा: भारताने आज सर्वात दूरचं लक्ष्य भेदणाऱ्या अग्नी 5 या क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी केली. ओदिशातील अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली.


अग्नी 5 मिसाईलची क्षमता तब्बल 5 हजार किमीपेक्षा जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे अणूबॉम्ब किंवा तत्सम हत्यारांची वाहनक्षमता या मिसाईलमध्ये आहे.

जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या अग्नी 5 क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 2012 मध्ये झाली होती. आता या क्षेपणास्त्राचा भारताच्या युद्धताफ्यात समावेश होणार आहे.

अग्नी 5 च्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं.

भारताने यापूर्वी अग्नी 1,2,3 या क्षेपणास्त्रांचा युद्धताफ्यात समावेश केला आहे. ही तीनही क्षेपणास्त्र पाकिस्तानचा धोका ओळखून आणली आहेत. तर अग्नी 5 हे चीनचा सामना करण्यासाठी असल्याचं सांगण्यात येत आहे.

अग्नी 5 क्षेपणास्त्राचं वजन सुमारे 50 टन आहे. त्याची लांबी 17 मीटर, रुंदी 2 मीटर आहे. याची वाहक क्षमता तब्बल 1500 किमी इतकी आहे. हे क्षेपणास्त्र 5 हजार किमीवरील लक्ष्य भेदू शकतं. इतक्या क्षमतेची क्षेपणास्त्र सध्या अमेरिका, रशिया, चीन, इंग्लंड आणि फ्रान्सकडे आहे.