लखनौ : लखनौमधील हजरतगंज या उच्चभ्रु परिसरातील मीराबाई गेस्ट हाऊसबाहेर एक आयएएस अधिकारी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. या मृत आयएएस अधिकाऱ्याचं नाव अनुराग तिवारी असून ते कर्नाटक कॅडरचे आहेत.


आज सकाळी 6.40 वाजता मीराबाई गेस्ट हाऊसजवळ एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी मिळालेल्या ओळखपत्रावरुन मृतदेह आयएएस अनुराग तिवारी यांचा असल्याचं स्पष्ट झालं, असं पोलिसांनी सांगितलं.

अनुराग तिवारी उत्तर प्रदेशातील बहराईचचे रहिवासी होते. बंगळुरुच्या खाद्य आणि पुरवठा विभागाचे आयुक्त होते.

अनेक वरिष्ठ अधिकारी मीराबाई गेस्ट हाऊसवर पोहोचले असून तपास सुरु आहे. त्यांचे फोन कॉल्सही तपासले जात आहेत. अनुराग तिवारी यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

अनुराग तिवारी 2007 बॅचचे आयएएस होत. काही वृत्तानुसार पत्नीसोबत त्यांचे वाद सुरु होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, गेस्ट हाऊसपासून केवळ 50 मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती आणि नाकातून रक्तही वाहत होतं. तीन डाक्टरांचं पथक त्यांचं पोस्टमॉर्टेम करेल.