नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या तिहेरी तलाकच्या सुनावणीचा चौथा दिवस कपिल सिब्बल यांनी गाजवला. कपिल सिब्बल यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं वकील म्हणून बाजू मांडली.


कोर्टानं कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, या धाग्याभोवती कपिल सिब्बल यांचा संपूर्ण युक्तीवाद होता. कोर्टात बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी रामजन्म आणि गोरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. मात्र कोर्टानं राजनैतिक मुद्यांवर भाष्य न करण्याचं आवाहन करत, फक्त तिहेरी तलाकवर युक्तीवाद करण्याच्या सूचना दिल्या.

यानंतर कपिल सिब्बल म्हणाले की, ''तिहेरी तलाकची परंपरा 1400 वर्ष जुनी आहे. तसेच सुन्नी मुसलमानांचा एक मोठा वर्ग याचं पालन करतो. त्यामुळे 16 कोटी जनतेशी संबंधित मुद्द्यावर न्यायालयाने निर्णय देऊ नये.''

यावर न्यायालयानं ही परंपरा 1400 वर्ष जुनी असली, तरी त्याच्या विरोधात मुस्लीम महिला दाद मागत आहेत. त्यामुळे आपल्याला त्यावर निर्णय द्यावाच लागेल असं मत न्यायालयानं मांडलं.

त्यावर सिब्बल यांनी जैन साधूंच्या वेशभूषेवरुनही टिप्पणी करत, कायद्याचा कोणत्या मर्यादेपर्यंत हस्तक्षेप असेल, असा प्रश्न न्यायालयाला विचारला. सिब्बल यांच्या या युक्तिवादावर सुप्रीम कोर्टानं याप्रकरणी सुनावणी करु नये का? असा सवाल विचारला. तर त्यावर सिब्बल यांनी होकारार्थी उत्तर दिलं.

सुप्रीम कोर्टात गुरुवारपासून यावर सुनावणी सुरु असून, काल यावरील सुनावणीवेळी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकारी तिहेरी तलाकबाबत बाजू मांडली. सुप्रीम कोर्ट जर या प्रथेला बंद करणार असेल, तर केंद्र सरकार यासाठी कायदा करेल, असं रोहतगी यांनी न्यायलयाला सांगितलं होतं.  या आठवड्याच्या अखेरीस तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय सुनावण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

... तर तिहेरी तलाकसाठी केंद्र सरकार कायदा करेल!

BLOG: ‘तोंडी तलाक’ला आता न्यायाची प्रतिक्षा

‘तिहेरी तलाक’ची प्रथा सर्वात वाईट, सुप्रीम कोर्टाचं परखड मत

ट्रिपल तलाकबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, 6 दिवस युक्तीवाद चालणार

कोर्टातच बायकोला ‘ट्रिपल तलाक’ देऊन पती फरार!


चहाचा कप हातातून निसटला, पती म्हणाला तलाक…तलाक…तलाक…


मुस्लिम लॉ बोर्ड घटनेपेक्षा मोठं नाही, तोंडी तलाक क्रूरपणा: अलाहाबाद हायकोर्ट