नवी दिल्ली :  देशातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या अभावी गेल्या दोन दिवसात 45 जणांनी आपला जीव गमावला आहे. अशा परिस्थितीत आता देशातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हवाई दलाने कंबर कसली असून IAF च्या विमानाने ऑक्सिजनचे मोकळे टॅन्कर आणि कन्टेनर घेऊन सिंगापूरकडे उड्डाण केलं आहे. त्या ठिकाणी ऑक्सिजन भरून हवाई दलाचे हे विमान संध्याकाळपर्यंत भारतात परत येणार आहे.


 






देशात आज 3.47 लाख नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यातच अनेक रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आता हवाई दलाने पुढाकार घेतला असून देशातील रुग्णालयांना ऑक्सिजनची पुरवठा सुरळीत करण्यासाठी कंबर कसली आहे. 


आज हवाई दलाचे  C-17 विमान क्रायोजेनिक ऑक्सिजन टॅन्कचे चार कन्टेनर घेऊन सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचलं आहे. हे विमान या ठिकाणी ऑक्सिजन भरेल आणि संध्याकाळपर्यंत पश्चिम बंगालच्या पनागर एअरबेसवर उतरेल. 


कालपासून हवाई दलाने ऑक्सिजनचे टॅन्कर आणि कन्टेनर देशभरातील फिलिंग स्टेशनवर पोहोचवण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे या कामात गती आली आहे. तसेच हवाई दलाच्या विमानांनी मुंबई, कोच्ची, विशाखापट्टनम आणि बंगळुरु या ठिकाणच्या डॉक्टर्स, नर्सेसना दिल्लीमध्ये पोहोचवण्याच काम सुरू केलंय.  


महत्वाच्या बातम्या :