नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला 'ग्रँड ओल्ड पार्टी' म्हटलं जातं. मात्र आगामी काळात काँग्रेसला 'ग्रँड ओल्ड अँड यंग पार्टी' बनवणार आहे. त्यासाठी तरुणांनो, एकत्र या, आपण एकतेचं आणि प्रेमाचं राजकारण करु, असे आवाहन काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.


"एकदा देशात आग लावली, तर ती विझवणं कठीण असतं. हीच गोष्ट आम्ही भाजपला सांगू इच्छितो. भाजपचे लोक देशात हिंसेची आग पसरवत आहेत. ते तोडतात, आम्ही जोडतो. ते आग लावतात आम्ही विझवतो.", असे म्हणत काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतरच्या पहिल्याच भाषणातून राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला.

"भाजपचे लोक देशभर हिंसेची आग पसरवत आहेत, ही आग रोखण्याची ताकद काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच आहे. हे करण्यापासून भाजपला कोणी रोखू शकतो तो फक्त काँग्रेसाच प्रेमळ कार्यकर्ता आणि नेता. आपण काँग्रेसला ग्रॅण्ड ओल्ड अॅण्ड यंग पार्टी बनवणार आहोत. द्वेषाच्या राजकारणाविरोधात आपण लढा देऊ", असा विश्वासही राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.

"भाजपशी मतभेद जरी असले, तरी भाजप कार्यकर्त्यांना आपण भाऊ किंवा बहीणच मानतो. ते आवाज दाबतात पण आपण आवाज उठवू. ते प्रतिमा मलिन करतात तर आणि आदर करतो.", असे राहुल गांधींनी म्हटले.