Beauty Parlour Stroke Syndrome Case in Hyderabad : सौंदर्य जपण्यासाठी (Beauty Tips) आपण अनेक गोष्टी करतो. बाजारातील उत्पादनं, घरगुती उपाय, मेकअप प्रोडक्ट्स यांसारख्या अनेक गोष्टींचा आधार आपण घेतो. त्याशिवाय पार्लरमध्ये हजारो रुपये खर्चही करतो. पार्लरमध्ये चेहऱ्यासोबतच केसांचंही सौंदर्य जपण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट करुन घेतो. पण अशीच एक पार्लर ट्रिटमेंट घेणं महिलेच्या चांगलंच महागात पडलं आहे. पार्लर ट्रिटमेंट (Beauty Parlour Treatment) घेत असताना महिलेला अचानक ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) आला आणि तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


हैदराबादमध्ये (Hyderabad) घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं सध्या भितीचं वातावरण पसरलं आहे. पार्लरमध्ये (Beauty Parlour) हेअर वॉश (Hair Wash Treatment) करत असताना एका 50 वर्षीय महिलेला ब्रेन स्ट्रोक आला. हेअर वॉश ट्रिटमेंट घेत असताना महिलेला ब्रेन स्ट्रोक आल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. महिलेच्या डॉक्टरांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, महिला पार्लरमध्ये हेअर वॉश ट्रिटमेंट घेत होती. त्यावेळी वॉश बेसीनवर तिची मान वाकल्यानं तिच्या मेंदूला पुरवठा करणाऱ्या मेंदूच्या रक्तवाहिनीवर दाब पडल्यानं तिला ब्रेन स्ट्रोक आला. महिलेवर उपचार करणारे न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी ट्विटरवर ही माहिती शेअर केली आहे. 



डॉ. सुधीर कुमार यांनी ट्विटरवर सांगितलं की, "ब्युटी पार्लरमध्ये हेअर वॉश ट्रिटमेंट घेत असतानाच महिलेला सुरुवातीला चक्कर येणं, मळमळ आणि उलट्या होणं यांसारखी लक्षणं जाणवत होती. त्यामुळे सुरुवातीला तिला गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टकडे नेण्यात आलं. त्यांनी तिच्यावर उपचार केले. पण महिलेची प्रकृती सुधारली नाही. लक्षणं आणखी वाढत गेली. दुसऱ्या दिवशी चालताना महिलेला तोल गेल्यासारखं वाटू लागलं. त्यावेळी तिला कोणीतरी माझ्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी महिला ठिका होती, काहीशी सेरेबेलर लक्षणं होती. एमआरआय आणि इतर काही टेस्ट केल्यानंतर महिलेला ब्रेन स्ट्रोक आल्याचं निष्पन्न झालं." 


डॉक्टरांनी पुढे माहिती दिली की, "शॅम्पूनं केस धुताना मान वॉश-बेसिनवर ठेवल्यानं असं झालं आहे. दरम्यान, योग्य उपाचार घेतल्यानंतर महिलेची प्रकृती आता स्थिर आहे. तसेच, लक्षणंही कमी झाली आहेत."



'ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम' संदर्भात सर्वात पहिल्यांदा डॉ. मायकेल वेनट्रॉब यांनी 1993 मध्ये अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नलमध्ये नमूद केले होतं. जेव्हा पाच महिलांना हेअर सलूनमध्ये हेअर वॉश ट्रिटमेंट घेतल्यानंतर गंभीर न्यूरोलॉजिकल लक्षणं विकसित झाली होती. गंभीर चक्कर येणं, तोल जाणं आणि चेहरा सुन्न होणं या तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. यामुळे पाचपैकी चौघांना पक्षाघाताचाही झटका आला होता. 2016 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात 'द गार्डियन'ने हे प्रसिद्ध केलं आहे.