हैदराबाद : हैदराबादमधील एका व्यक्तीने आपल्या खात्यात 10 हजार कोटी रुपये असल्याची माहिती दिल्याचं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जाहीर केलं आहे. काळा पैसा योजनेच्या आधारे नायडूंनी हा दावा केला आहे.
हैदराबादमध्ये आयडीसी काळा पैसा योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या 13 हजार कोटी रुपयांपैकी 10 हजार कोटी रुपये एकाच व्यक्तीचे असल्याचा दावा नायडूंनी केला आहे. या दाव्यातून नाव न घेता नायडूंनी एकप्रकारे त्यांच्या राजकीय शत्रूंकडे अंगुलीनिर्देश केल्याचं म्हटलं जातं.
काळा पैसा रोखण्यासाठी चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्दबातल करण्याची मागणीही चंद्राबाबू नायडूंनी उचलून धरली आहे.
'देशभरातून 65 हजार कोटी रुपयांचं काळ धन जाहीर करण्यात आलं आहे. त्यापैकी 20 टक्के म्हणजे 13 हजार कोटी रुपये एकट्या हैदराबादेत आहेत. त्यातलेही 10 हजार कोटी रुपये एकाच व्यक्तीचे आहेत. कायद्यानुसार ही व्यक्ती कोण, हे आम्ही जाणून घेऊ शकत नाही. एखाद्या व्यावसायिकाला इतकी मोठी रक्कम जाहीर करणं शक्य आहे का?' असा सवाल नायडू यांनी एका पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
'नजीकच्या भविष्यात म्हणजे येत्या दोन-तीन किंवा पाच वर्षांत ते काळा पैसा नियमित करुन घेतील. 40 ते 45 टक्के दंड भरायचा आणि ब्लॅक मनी व्हाईट होणार. हे चांगलं नाही का? कोणीच प्रश्न उपस्थित करु शकत नाही.' अशी टिप्पणीही चंद्राबाबूंनी केली.
'भ्रष्टाचारी व्यक्ती काळा पैसाधारकांच्या दृष्टीने राजकारण हा लपण्यासाठी आडोसा झाला आहे. राजकारणातील काही व्यक्ती जनादेशाचा गैरवापर करत आहेत. काळा पैसा रोखण्यासाठी चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्दबातल करण्याची मागणी मी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून करणार आहे. त्यामुळे बँक व्यवहारांना चालना मिळेल. तसंच मतं विकत घेण्यालाही चाप बसेल.' असंही नायडू म्हणाले.