नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायदा देशभरात लागू झाल्यानंतर या कायद्याच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. दुसरीकडे हैदराबादमधील चिलकूर बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी रंगराजन यांनी सीएए अंतर्गत देवी-देवतांच्या नागरिकत्वाची मागणी केली आहे. देशात देवी-देवतांची अवस्था अल्पसंख्याकांपेक्षा वाईट आहे. म्हणूनच देवाला नागरिकत्व देण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली आहे.


देशभरातील मंदिरांसोबत राज्य सरकारचं वर्तन योग्य नसल्याचे सांगत पुजाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असून सीएए अंतर्गत तिरुपती बालाजी, पद्मनाभ स्वामी आणि सबरीमाला यांना नागरिकत्व देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

चिलकुर बालाजी मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या अधिक -
हैदराबाद शहरापासून काही अंतरावर चिलकूर बालाजीचे मंदिर आहे, जिथे दिवसभर भाविकांची वर्दळ असते. परदेशात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांमध्ये अशी श्रद्धा आहे, की या मंदिरात प्रार्थना करून पासपोर्ट पटकन मिळतो. त्यामुळेच या ठिकाणी तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मंदिराचे मुख्य पुजारी रंगराजन आहेत, तेलगू समाजात त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. सबरीमाला सुप्रीम कोर्टाचे प्रकरण असो, किंवा देशातील इतर धार्मिक कार्य रंगाराजन यांच्या कुटुंबाचा त्यात सक्रिय सहभाग असतो.

देवासाठी नागरिकत्वाची मागणी करणारे रंगराजन यांनी देशभरातील राज्य सरकार विरोधात राग व्यक्त केला आहे. मंदिरात राहणारे देव केवळ मूर्ती नाहीये. तर, त्यांना महाराजासारखं ठेवलं जातं. सकाळी या देवतांची पुजा होते तर सायंकाळी सांजआरती. केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिराचा देशात समावेश झाल्याचा किस्सा सांगत रंगराजन यांनी जुन्या कायद्यांची आठवण सांगितली.

देवी-देवतांना नागरिकत्व देण्याची गरज - रंगराजन
मंदिरांमध्ये सरकारकडून होणाऱ्या हस्तक्षेपाबद्दल रंगराजन यांनी रोष व्यक्त केला आहे. सरकारच्या हस्तक्षेपामुळे मंदिरांमध्ये होणारे पुजा-पाठ व्यवस्थित होत नसल्याचा आरोप रंगराजन यांनी केला. म्हणूनच देवाला नागरिकत्व देण्याची गरज आहे. जेणेकरून त्यांनाही अधिकार असतील आणि त्या अधिकारांचे रक्षण करता येईल. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सरकारने देवाच्या जमिनींच्या हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोपही या रंगराजन यांनी केला. केमिकल इंजीनियर आणि कायद्याचा अभ्यास करणारे रंगराजन यांनी घटनेच्या विविध पैलूंवर चर्चा करताना हिंदू मंदिरातील मूर्तींना नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे. ते म्हणतात की सबरीमाला मंदिर आणि इतर हिंदू देवतांना 1955 च्या नागरिकत्व कायद्याच्या कलम 5 (4)अंतर्गत नागरिकत्व दिले जावे.

Nagpada CAA Protest | सीएए,एनआरसीविरोधात मुंबईच्या नागपाड्यात महिलांचा ठिय्या, दिल्लीप्रमाणे मुंबईतही आंदोलनं