मुंबई : एक रुपयाची नोट शंभर वर्षांची झाली आहे. चांदीचं नाणं ते नोट असा हा गेल्या 100 वर्षांचा प्रवास अत्यंत रंजक असाच आहे.   


चांदीचं नाणं ते नोट

पहिल्या महायुद्धाचा तो काळ होतो आणि भारतात इंग्रजांची सत्ता होती. त्यावेळी भारतात एक रुपयाचं नाणं चलनात होतं. विशेष म्हणजे, हे नाणं चांदीपासून बनवलं जाई. मात्र युद्धादरम्यान चांदीचं नाणं बनवणं परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळे 1917 मध्ये पहिल्यांदा एक रुपयाची नोट चलनात आणली गेली आणि या नोटेने चांदीच्या नाण्याची जागा घेतली. एक रुपयाची नोट छापली गेली, ती तारीख होती 30 नोव्हेंबर 1917. या नोटेवर इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचमचा फोटो छापण्यात आला होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, एक रुपयाच्या नोटेची छपाई पहिल्यांदा 1926 मध्ये बंद करण्यात आली होती. कारण नोट छापण्याचा खर्च परवडत नव्हता. त्यानंतर 1940 मध्ये पुन्हा छपाई सुरु करण्यात आली, जी 1994 सालापर्यंत चालू राहिली. त्यानंतर 2015 साली पुन्हा छपाई सुरु करण्यात आली.

एक रुपयाच्या नोटेवर कुणाची स्वाक्षरी असते?

एक रुपयाच्या नोटेबाबत खास गोष्ट म्हणजे, ही नोट इतर भारतीय नोटांप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी केली जात नाही, तर भारत सरकारकडून जारी केली जाते. त्यामुळे एक रुपयाच्या नोटेवर आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी नसते, तर केंद्रीय अर्थसचिवांची स्वाक्षरी असते.

कायद्याच्या आधारे एक रुपयाची नोट ही खऱ्या अर्थाने ‘मुद्रा’ नोट (करन्सी नोट) आहे. इतर नोटा या प्रॉमिसरी नोट असतात. प्रॉमिसरी नोटांवरुन केवळ नमूद रक्कम देण्याचं वचन दिले जाते.

दादरमधील नाण्यांचा संग्रह करणाऱ्या गिरीश वीरा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, “पहिल्या युद्धादरम्यान चांदीचे दर वाढले, त्यामुळे जी पहिली नोट छापण्यात आली, तिच्यावर एक रुपयाच्या चांदीच्या नाण्याचा फोटो छापण्यात आला. तेव्हापासून ती एक परंपराच झाली की, एक रुपयाच्या नोटेवर एक रुपयाच्या नाण्याचा फोटो छापला जाऊ लागला.”

आणखी एक रंजक बाब म्हणजे, इंग्रजांच्या काळात एक रुपयाच्या नोटेवर ब्रिटिश सरकारच्या तीन अर्थ सचिवांच्या स्वाक्षऱ्या असायच्या. एमएमएस गुब्बे, एसी मॅकवॉटर्स आणि एच. डेनिंग यांच्या स्वाक्षऱ्या नोटेवर असायच्या. मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 18 अर्थसचिवांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत.

एक रुपयाच्या नोटेची छपाई इतिहासात आतापर्यंत दोनदा रोखण्यात आली होती. शिवाय, नोटेच्या डिझाईनमध्येही तीन-एकवेळा लहान-मोठे बदल करण्यात आले होते, असेही गिरीश वीरा यांनी सांगितले.