अहमदाबाद : गुजरात विधानसभेसाठीचं मतदान अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं असताना, भाजपने प्रचारात धर्माचा मुद्दा काढला आहे. राहुल गांधींच्या सोमनाथ मंदिर दर्शनावरुन भाजपने शाब्दिक हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.


राहुल गांधींनी स्वत:ला 'बिगर हिंदू' म्हणवून घेतल्याचा दावा भाजपने केला आहे, तर तिकडे काँग्रेसने राहुल गांधींचा धर्म सिद्ध करण्यासाठी काही फोटो प्रसिद्ध केले. शिवाय, काँग्रेस नेते दीपेंद्र हुडा यांनी सोमनाथ मंदिरातील मूळ व्हिजिटर्स बुकचे फोटो प्रसिद्ध करुन भाजपच्या आरोपांमधील हवाच काढून घेतली.

नेमका वाद काय?

गुजरातमध्ये प्रचाराचा धुरळा उडवत भाजपला नाकीनऊ आणणाऱ्या राहुल गांधींनी बुधवारी (29 नोव्हेबर) सोमनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल होते. मंदिराच्या सुरक्षा विभागाच्या रजिस्टरमध्ये काँग्रेसचे माध्यम समन्वयक मनोज त्यागी यांनी राहुल गांधींच्या नावाची एन्ट्री 'बिगर हिंदू'च्या कॉलममध्ये केल्याचा दावा भाजपने केला आहे.

सोमनाथ मंदिरात कुणा बिगर हिंदूंना प्रवेश करायचा असल्यास, सुरक्षा विभागात जाऊन रजिस्टरमध्ये नाव नोंदवावं लागतं. हा नियम हिंदू धर्मियांसाठी नाही.

आता राहुल गांधींच्या धर्मावरुन भाजपने हल्ला चढवला आहे. शिवाय, सोशल मीडियावरुन राहुल गांधी हिंदू नसल्याचे ट्वीट करत ट्रोलही करण्यात आले. अर्थात, भाजपच्या या डावपेचाला काँग्रेसही बळी पडली आणि राहुल गांधी हिंदू असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही फोटो जारी केले.

राहुल गांधी जानवेधारी हिंदू : काँग्रेस

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात म्हटले, "राहुल गांधींनी 18 किलोमीटर चालत जाऊन केदारनाथचं दर्शन घेतलं, तरी भाजपला अडचण आहे. राहुल गांधी द्वारकाधीशाचं दर्शन घेण्यासाठी गेले, तरी भाजपला अडचण आहे. आता सोमनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं, तरी भाजपला अडचण आहे." शिवाय, ते पुढे म्हणाले, "राहुल गांधी केवळ हिंदू धर्मातले नाहीत, तर ते जानवेधारी हिंदू आहेत."



सोमनाथ मंदिराच्या व्हिजिटर्स बुकमध्ये राहुल गांधींनी नेमकं काय लिहिलं?

सोमनाथ मंदिराच्या व्हिजिटर्स बुकमध्ये राहुल गांधींनी 'बिगर हिंदू' कॉलममध्ये आपलं नाव लिहिलं असल्याचा दावा करण्यात येत असताना, काँग्रेसने व्हिजिटर्स बुकचे मूळ फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामधून असे स्पष्ट दिसून येते की, राहुल गांधींनी कुठेही धर्माचा उल्लेख केला नसून, त्यांनी सोमनाथ मंदिरात आल्यावर त्यांना काय वाटलं, हे एका ओळीत लिहून, त्याखाली आपली स्वाक्षरी केली आहे. शिवाय, सोमनाथ मंदिरात एकच व्हिजिटर्स बुक असून, ती हीच असल्याचे काँग्रेसने स्पष्टीकरणात म्हटले आहे.



गेली 22 वर्षे गुजरातमध्ये सत्ता असलेल्या भाजपने आता राहुल गांधींच्या धर्माच्या मुद्द्यावरुन वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत गुजरातमध्ये येत्या काळात विकासाचा मुद्दा बाजूला राहून धर्माचा मुद्दा केंद्रीत होणार असल्याचे दिसून येते आहे.

दरम्यान, येत्या 9 डिसेंबरला गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील 89 जागांसासाठी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान 14 डिसेंबरला होणार आहे. 18 डिसेंबरला निकाल जाहीर होईल.