नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आज (11 फेब्रुवारी) लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत असं सांगत हा देश केवळ चार लोक चालवत असल्याचा घणाघात त्यांनी केला. यावेळी भाषणाच्या शेवटी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली


कृषी कायद्यांवर राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी म्हणाले की, पहिल्या कृषी कायद्यामध्ये बाजारसमित्या बंद करण्याचा उल्लेख आहे. दुसऱ्या कृषी कायद्यात कोणताही उद्योजक हवं तेवढं धान्य, फळ आणि भाजीची साठवणूक करु शकतो. साठेबाजीला प्रोत्साहन देणं हे या कायद्याचं लक्ष्य आहे. तर तिसऱ्या कायद्यात जर एखाद्या शेतकऱ्यांने देशातील सर्वात मोठ्या उद्योजकाकडे भाजी आणि धान्यासाठी योग्य दर मागितला तर त्याला न्यायालयात जाण्यास परवानगी नसेल.


दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना बुधवारी (10 फेब्रुवारी) म्हटलं होतं की, तीनही कृषी कायद्यांचा विषय आणि उद्देश यावर चर्चा झालेली नाही. त्याच वक्तव्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे.


राहुल गांधी यांच्या भाषणावेळी भाजपच्या खासदारांनी जोरदार गदारोळ केला. यानंतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना बजेटवर चर्चा करण्यास सांगितलं.


'हम दो हमारे दो'चं सरकार
राहुल गांधी म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी कुटुंबनियोजनाचा नारा होता की हम दो हमारे दो. जसा कोरोना आता वेगळ्या रुपात आला आहे, त्याचप्रकारे हा नाराही दुसऱ्या स्वरुपात आला आहे. हा देश चार लोक चालवतात. प्रत्येकाला त्यांची नावं माहित आहेत. हम दो हमारे दो हे कोणाचं सरकार आहे.





राहुल गांधी पुढे म्हणाले की, हम दो हमारे दो...सगळ्यांना लक्षात असेल तो फोटो होता... चार क्यूट चेहरे, सुंदर चेहरे, मोठमोठे चेहरे. यावरुन संसदेत गदारोळ सुरु होता.


जेव्हा हा कायदा लागू होईल तेव्हा या देशातील शेतकरी, मजूर आणि छोट्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद पडेल. शेतकऱ्यांचं शेत जाईल, त्याला दर मिळणार नाही. छोट्या दुकानदारांचं दुकान बंद होईल आणि केवळ 'दो हम और हमारे दो' हा देश चालवतील.


दोन मित्रांमध्ये एक मित्र आहे त्याला फळ आणि भाजी विकण्याचा अधिकार आहे. यामुळे नुकसान भाजीविक्रेत्यांचं, छोट्या व्यापाऱ्यांचं, बाजारात काम करणाऱ्या लोकांचं होणार आहे. दुसऱ्या मित्राला संपूर्ण देशात धान्य, फळ आणि भाजी साठवायचा आहे, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले