Viral Video : आपल्या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. त्यासाठी मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश घेतला जातो. त्यासोबतच मुलाला बाहेरची शिकवणी देखील लावली जाते. मुलाच्या शिक्षणासाठी आई-वडील जिवाचे रान करत असतात. शिक्षकांना देखील आपल्या विद्यार्थ्याने शिकावं असं वाटत असतं. त्यासाठी विद्यार्थ्याकडून छोटी-मोठी चूक झाल्यानंतर शिक्षक त्यांना शिक्षा देखील करतात. एखाद्या चुकीसाठी विद्यार्थ्याला बेशुद्ध होईपर्यंत मारले जात नाही. परंतु, असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. कोचिंग क्लासच्या एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे. विद्यार्थी बेशुद्ध होईपर्यंत त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून निर्दयी शिक्षकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. 


मारहाण झालेल्या विद्यार्थ्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू असून निर्दयी शिक्षक फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ज्या विद्यार्थ्याला मारहाण झाली आहे तो केवळ पाच वर्षाचा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून देखील या शिक्षकाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विकास कुमार असे मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. 


सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून काळजाचा अक्षरश: थरकाप उडत आहे. मुलाला अमानुष मारहाण करणाऱ्या शिक्षकाच्या डोक्यावर परिणाम झालेला असू शकतो किंवा तो मानसिक रुग्ण  असू शकतो अशा भावना नेटकऱ्यामधून उमटत आहेत. 


मारहाणीचे कारण धक्कादायक
संबंधीत शिक्षकाला एका मुलीसोबत गैरवर्तन करताना पीडित मुलाने पाहिले होते. त्यामुळे शिक्षकाने मुलाला कॉम्प्युटर क्लासमध्ये नेहून मारहाण केली. याच रागातून नराधम शिक्षकाने मुलाला काठीने मारले. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करताना हातातील काठी तुटली. तरीही या निर्दयी शिक्षकाला घाम फुटला नाही. काठी उलटी करून दुसऱ्या बाजूने विद्यार्थ्याला मारहाण करतच राहिला. त्यानंतर या माथेफिरू शिक्षकाने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मुलगा मोठ-मोठ्याने ओरडत आहे. परंतु, दगडाच्या काळजाचा हा शिक्षक मुलाला दात-ओट खावून मारतच राहिला. शेवटी तो जमिनीवर कोसळला आणि वेशुद्ध झाला.  


मारहाणीची ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथे घडली आहे. पाटणामधील धनरुवा येथील वीर ओरियाराच्या जया कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये पीडित विद्यार्थी शिकवणी घेण्यासाठी जातो. जया पब्लिक स्कूलमध्ये जया क्लासेस अंतर्गत मुलांना शिकवणी देऊन नवोदय आणि सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्याची तयारी केली जाते. 


नातेवाईकांकडून शिक्षकाला चोप
विद्यार्थी बेशुद्ध झाल्यानंतर याबाबतची माहिती कोणीतर त्याच्या पालकांना कळवली. माहिती मिळताच मुलाचे पालक आणि नातेवाई कोचिंग क्लासमध्ये पोहोचले. काही नातेवाईकांनी पीडित विद्यार्थ्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले तर काही नातेवाईकांनी शिक्षक विकास कुमार याला बेदम चोप देऊन कोचिंग क्लासमधील वस्तूंची तोडफोड केली. नातेवाईकांनी याबाबत पोलिसांमध्ये देखील तक्रार केली आहे. परंतु, हा शिक्षक सध्या फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


शिक्षकावर कारवाई
कोचिंगच्या संचालक अमरकांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षकाला बीपीचा त्रास आहे. बीपी वाढल्यामुळे त्याने मुलाला बेदम मारहाण केली. विकास कुमार केलेला हा प्रकार चुकीचा असून आम्ही त्याला आमच्या कोचिंगमधून काढून टाकले आहे.  


जिवे मारण्याची धमकी 


विकास कुमार याने मुलाला मारहाण करून तो एवढ्यावरच थांबला नाही. तर ही गोष्ट घरात कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिली होती.  


व्हिडीओ पाहा