नवी दिल्ली: घर खरेदी केल्यानंतर घराचा ताबा मिळवण्यासाठी आतुर असलेल्या ग्राहकांना राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगातर्फे दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. घर खरेदीनंतर त्याचा ताबा दिलेल्या मुदतीच्या एका वर्षानंतर देखील मिळाला नसेल तर ग्राहकाला पैसे परत मागण्याचा अधिकार मिळणार आहे. राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगातर्फे हा निकाल जाहीर केला गेला आहे.


दिल्लीच्या रहिवासी शालभ निगम यांनी 2012 मध्ये ऑरिस इन्फ्रास्ट्रक्चर आणि 3 सी कंपनीने विकसित केलेल्या लक्झरी गृहनिर्माण प्रकल्पात एक फ्लॅट खरेदी केला होता. सुमारे 1 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाविरोधात निगम यांनी 90 लाखांची भरपाई केली होती. करारानुसार, घर वाटपाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत घराचा ताबा दिला जाणार होता. जेव्हा पूर्ण होऊ शकलं नाही तेव्हा निगम यांनी फ्लॅटची परतफेड करण्याच्या दिशेने वकील  आदित्य परोलिया यांच्याद्वारे आयोगाकडे संपर्क साधला. यासंबंधी याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने दखल घेतली आणि राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोगाने हा निर्णय जाहीर केला.

जर घराचा ताबा मिळवण्यासाठी उशीर होत असला तर बिल्डरला ग्राहकांना प्रति वर्षी सहा टक्के अशा दराने भरपाई द्यावी लागणार आहे. वेळेत घराचा ताबा न दिल्यास दहा टक्के व्याजासह ग्राहकाने दिलेली पूर्ण रक्कम परत द्यावी लागणार आहे. सुप्रीम कोर्ट आणि ग्राहक न्यायालयांसह न्यायिक मंचानी वारंवार हे सांगितले आहे की घरमालकांना अनिश्चित काळासाठी प्रतीक्षा करता येणार नाही, परंतु विलंब झाल्यास दावा कधी केला जाऊ शकतो हे स्पष्ट केले गेले नाही.