सातारा : साताऱ्याची गिर्यारोहक प्रियांका मोहितेने मकालू शिखर सर करुन आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. मकालू शिखर सर करणारी प्रियंका ही पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे. मकालूची उंची आठ हजार मीटर्सपेक्षा अधिक असून, ते जगातलं पाचव्या क्रमांकाचं उंच शिखर आहे.


अष्टहजारी उंची गाठणं इतकं सोपं नाही. मात्र या महाराष्ट्र कन्येने 15 मे 2019  रोजी मकालू शिखर सर करत हा विक्रम घडवला.
प्रियांका मोहितेने याआधी माऊंट एव्हरेस्ट, किलिमांजरो आणि ल्होत्से ही जगातील उंच शिखरं सर केली आहेत. याच कामगिरीसाठी तिला महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवलं आहे. प्रियांकाने चढाई केलेलं हे आठ हजार मीटरपेक्षा अधिक उंचीचं तिसरं शिखर ठरलं आहे.

VIDEO | पुण्यातील 'गिरीप्रेमी'ची भारतातील सर्वाधिक उंचीच्या 'कांचनजुंगा' हिमशिखरावर चढाई



प्रियांकाने याआधी अनेक हिमालयीन मोहिमा सहज पूर्ण केल्या आहेत. तिने अनेक उंच शिखरं पादाक्रांत केली आहेत. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी प्रियांकाने जगातील सर्वोच्च शिखर माऊण्ट एव्हरेस्ट सर केलं होतं. 2018 साली जगातील चौथ्या क्रमांकाचं ल्होत्से शिखर सर केलं.
गिरीप्रेमीने इतिहास रचला, माऊंट कांचनजुंगा मोहीम फत्ते

प्रियांकाने तिचं गिर्यारोहणातील शिक्षण नेहरु इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगमधून घेतलं आहे. बंदरपूच या शिखरापासून सुरुवात करत तिचा गिर्यारोहणातील प्रवास सुरु झाला. "छत्रपती शिवाजी महाराजांना मी माझा आदर्श मानते आणि यशाची उंची गाठण्याचा प्रयत्न करते", असं ध्येयवेडी प्रियांका म्हणते. 'गिर्यारोहण हे क्षेत्र कायम पुरुषप्रधान मानलं जातं. पण मला हा समज मान्य नाही. म्हणूनच महिलाही मागे नसल्याचं सिद्ध करण्याचा मी प्रयत्न करते.' असं प्रियांका उत्साहाने सांगते.

बंगळुरुच्या एका बायोटेक कंपनीमध्ये संशोधक म्हणून प्रियांका काम करते. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या वेळेत नोकरी करत उरलेल्या वेळात ती मोहिमा आणि पर्वत चढाईचा सराव करत असते. इथवरच न थांबता, तिचा जगातील सर्वच अष्टहजारी उंचीची शिखरं सर करायचा मानस आहे. कधीही स्वतःला कमकुवत समजू नका आणि जगातील कोणतीही गोष्ट साध्य करायला कठीण नसते, असा संदेश प्रियांकाने महिलांना दिला आहे.