मुंबई : केसांसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्राय शॅम्पूमुळे (dry shampoo) कॅन्सर होण्याचा धोका वाढत असल्याच्या बातम्या आल्यानंतर युनिलिव्हर (Unilever) कंपनी अडचणीत आली आहे. युनिलिव्हरने आपले अनेक एरोसोल ड्राय शॅम्पू उत्पादनं माघार घेतली आहेत. यामध्ये डव्ह, नेक्सस, ट्रेसमे आणि टिग्गी या शॅम्पू उत्पादनांचा समावेश आहे. या उत्पादनांमध्ये कॅन्सरला कारणीभूत असलेले बेन्झिन (benzene) सापडल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 


ऑक्टोबर 2021 च्या आधी बनवण्यात आलेले युनिलिव्हरचे एरोसोल ड्राय शॅम्पू मागे घेण्यात आलेले आहेत. या आधी जॉन्सन अॅंड जॉन्सन, अॅजवेल पर्सनल केअर या कंपन्यांनी त्यांच्या गेल्या दीड वर्षातील एरोसोल सनस्क्रिन आणि इतर प्रोडक्ट मागे घेतले होते. त्या अतिरिक्त अॅन्टिपार्सिपिरेंट्स देखील मागे घेण्यात आले आहेत. यामध्ये बेंन्झिन सापडल्याने ही सर्वच उत्पादने मागे घेण्यात आली होती. 


ड्राय शॅम्पू म्हणजे काय?


ड्राय शॅम्पूचा उपयोग आपण आपले केस न भिजवता त्यांच्या सफाईसाठी करु शकतो. ड्राय शॅम्पू हे पावडर किंवा स्प्रेच्या स्वरुपात बाजारात मिळतं. स्टार्च किंवा अल्कोहोल मिश्रित हे शॅम्पू आपल्या केसांवर जमा झालेले तेल आणि ग्रीसची सफाई करतात आणि त्याला दाट करतात. काही ड्राय शॅम्पूमध्ये एरोसोल स्प्रे असतो. 


केसांना काय नुकसान होऊ शकतं? 


ड्राय शॅम्पूमध्येमध्ये बेन्झिन असल्याचं स्पष्ट झालं आहे. शॅम्पूच्या माध्यमातून बेन्झिन आपल्या शरीरात प्रवेश करु शकतं. त्यामुळे ब्लड कॅन्सर, ल्यूकेमिया आणि ब्लड डिसॉर्डचा धोका निर्माण होऊ शकतो. ज्या उत्पादनांमध्ये बेन्झिन सापडलं आहे, ती उत्पादनं माघार घेण्यात आली आहेत. 


मागे घेण्यात आलेल्या उत्पादनांची नावं 


यूनिलिव्हर कंपनीने डव्ह ड्राय शॅम्पू वॉल्यूम अॅंड फुलनेस, डव्ह ड्राय शॅम्पू कोकोनट, डव्ह ड्राय शॅम्पू फ्रेश अँड फ्लोरल, नेक्सस ड्राय शॅम्पू रिफ्रेशिंग मिस्ट, नेक्सस इनर्जी (inergy), फोम शॅम्पू अॅंड रिवाइव्ह, सुआव ड्राय शॅम्पू हेयर रीफ्रेशर, ट्रेस्मे ड्राय शॅम्पू वॉल्यूमायजिंग आणि बेड हेड रॉकाहोलिक डर्टी सीक्रेट ड्राय शॅम्पू 


जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द 


सप्टेंबर महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा (Johnson Baby Powder) परवाना रद्द करण्यात आला आहे. उत्पादनाच्या पद्धतीत दोष असल्यानं अन्न आणि औषध प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईमधील मुलुंड स्थित जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा परवाना रद्द केला आहे. पुणे आणि नाशिक येथील या पावडरचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्यामध्ये काही धोकादायक पदार्थ आढळल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरचा परवाना रद्द केला. या पावडरचे पीएच मूल्य अनिवार्य मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.