Hinduja Groups: चार हिंदुजा बंधूंपैकी ज्येष्ठ असलेले आणि हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे बुधवारी लंडनमध्ये निधन झाले, वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदुजा यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती कुटुंबीयांच्यावतीने देण्यात आली. एस. पी. हिंदुजा यांच्या निधनाने उद्योग जगतातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
श्रीचंद पी. हिंदुजा किंवा एस.पी. म्हणून ते ओळखले जात होते, 50 च्या दशकाच्या सुरुवातीला शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले होते. त्यांच्या पश्चात गोपीचंद हिंदुजा, प्रकाश हिंदुजा आणि अशोक हिंदुजा हे त्यांचे तीन भाऊ आहेत, यासोबतच दोन मुली शानू आणि विनू असा त्यांचा परिवार आहे.
आरोग्यसेवा (Healthcare), बँकिंग (Banking) आणि रसायने (Chemicals) या क्षेत्रांमध्ये हिंदुजा कुटुंबाचा व्यवसाय पसरलेला आहे. जगभरातील सुमारे 2 लाख लोकांना हिंदुजा कंपनी रोजगार देते, त्यांच्या अफाट संपत्तीने श्रीचंद, गोपीचंद यांच्यासह संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला 2022 च्या 'द संडे टाइम्स यूके'च्या श्रीमंतांच्या यादीत अग्रस्थान मिळाले आहे. त्यांची एकूण संपत्ती 28 अब्ज पौंड ($33 अब्ज) आहे.
एस. पी. हिंदुजा यांनी हिंदुजा समूहाच्या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते एक अग्रगण्य अनिवासी भारतीय उद्योजक (NRI Businessman) होते आणि भारतातील पहिली नवीन खाजगी बँक असलेल्या IndusInd बँकेच्या संकल्पनेत त्यांचा मोलाचा वाटा होता.
एस. पी. हिंदुजा यांनी हिंदुजा समूहाची संस्थापक तत्त्वे आणि मूल्ये मूर्त रूपात साकारली. एस. पी. हिंदुजा हे एक खोल आध्यात्मिक आणि परोपकारी व्यक्तिमत्व होते. एस. पी. हिंदुजा हे उदार मनाचे होते आणि कामात अत्यंत अचूक होते.
आशिया, मध्य-पूर्व युरोप आणि अमेरिकेतील विविध अर्थव्यवस्थांमध्ये अनेक वर्षांचा व्यावसायिक अनुभव त्यांनी मिळवला. मुक्त बाजार अर्थव्यवस्था (Free Market Economy) विविध संस्कृतींमध्ये (cultures) सहिष्णुता आणि समजूतदारपणा वाढवू शकते आणि यामुळे मानवजातीचा फायदा होऊ शकतो, यावर त्यांचा विश्वास होता.
हिंदुजा समूह हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. परमानंद हिंदुजा यांच्या निधनानंतर 1971 मध्ये त्यांच्या मुलांनी कौटुंबिक वारसा हाती घेतला. अशोक लेलँड, गल्फ ऑइल, हिंदुजा बँक स्वित्झर्लंड, इंडस्इंड बँक, हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स, हिंदुजा टीएमटी, हिंदुजा व्हेंचर्स, इंडसइंड मीडिया आणि कम्युनिकेशन्स लिमिटेड या हिंदुजा समुहाच्या प्रमुख कंपन्या आहेत.